उपजिल्हा रुग्णालय बनले तपासणी केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:18 AM2018-10-14T00:18:37+5:302018-10-14T00:18:42+5:30
येथील उपजिल्हा रुग्णालयावर कोट्यावधी रुपये खर्च करुन देखील उपजिल्हा रुग्णालयातील साहित्याची दुरावस्था झली आहे. परिसरातील चारशे ते पाचशे गावातील ग्रामस्थांना आरोग्य सेवा देण्यासाठी या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली होती. मात्र मागील पाच वर्षांपासून रुग्णालयातील सर्वच उपयोगी साहित्य मोडकळीस आले आहे. परिणामी, रुग्णालय केवळ शिबिराच्या रूपात तपासणी केंद्र म्हणूनच चालले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : येथील उपजिल्हा रुग्णालयावर कोट्यावधी रुपये खर्च करुन देखील उपजिल्हा रुग्णालयातील साहित्याची दुरावस्था झली आहे. परिसरातील चारशे ते पाचशे गावातील ग्रामस्थांना आरोग्य सेवा देण्यासाठी या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली होती. मात्र मागील पाच वर्षांपासून रुग्णालयातील सर्वच उपयोगी साहित्य मोडकळीस आले आहे. परिणामी, रुग्णालय केवळ शिबिराच्या रूपात तपासणी केंद्र म्हणूनच चालले आहे.
एकेकाळी वसमत चे उपजिल्हा रुग्णालय औंढा, वसमत तालुक्यासाठी मोठे वरदान ठरलेले रुग्णालय होते परंतु आता येथील शस्त्रक्रिया केंद्र , एक्स-रे केंद्र रक्तपेढी, पॅथॉलॉजी बंदच आहेत. औषधींचा खडखडाट असून दवाखान्यात पिण्याचे पाणी तर नाहीच शिवाय परिसरातही प्रचंड प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. रुग्णालयातील सर्व शौचालय बंद असल्याने रुग्णालय परिसरात रुग्णासह नातेवाईकांची गेल्या अनेक दिवसांपासून कुचंबणा होत असल्याचे चित्र आहे. या रूग्णालयात आंतर रूग्णांसाठी तीन वार्डची व्यवस्था करण्यात आली असली तरी रुग्णालयातील असुविधेमुळे सध्या केवळ एकच वार्ड वापरात आहे. शिवाय वार्ड क्रमांक २ व ३ चे लॉक कधीच काढलेले आढळत नसून ते नेहमीच बंद असते.
रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक गरजू रूग्णांना औषध मिळतच नाही, तर केवळ सल्ला दिला जातो किंवा नांदेड सारख्या रुग्णालयात रेफर केले जात असल्याने या रुग्णालयाची अवस्था रामभरोसे असल्याचे चित्र आहे. रुग्णालयातील अस्वच्छता, असुविधा यासंदर्भात अनेक वेळा नागरिक तक्रारी करतात. परंतु रुग्णालय प्रशासनाकडून याबाबत कधीच दखल जात नाही. रुग्णालयातील कर्मचाºयांसोबत अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांचे वादही होतात. परंतु रुग्णालय प्रशासनाने कधीच याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, हे विशेष. केवळ आॅनलाईन सुविधा, टेंडरिंग, वरिष्ठ यंत्रणेच्या हातात आहे. अशी कारणे सांगूनच वेळ मारून नेली जात असून येथील सुविधे विषयी कुणालाही गरजच राहिली नाही. येथे अतिशय गरीब, निराधार, रूग्ण उपचार घेण्यासाठी येतात. त्यांच्याकडे औषधी करीता पैसेही नसतात.
अशावेळी रुग्णासोबत आलेल्यांचा कर्मचाºयांशी वाद होत असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा सपाटा चालू असून त्यावर ठोस उपाय करण्यात रुग्णालय प्रशासन अपयशी ठरत आहे. रूग्णालयीन अधीक्षकासह यंत्रणेतील जबाबदार घटक व वरिष्ठांनी रुग्णालयातील सुविधा सुरळीत कराव्यात, औषधांची उपलब्धता करावी आणि रुग्णालयाचा दर्जा उत्तम ठेवण्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी जनतेकडून केली जात आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्षच आहे.