"अशा कंडक्टरला पायाखाली तुडवीन"; विद्यार्थींनींच्या तक्रारीनंतर आ. बांगरांनी भरला दम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 01:46 PM2023-08-19T13:46:10+5:302023-08-19T13:48:19+5:30
हिंगोली जिल्ह्यातील शाळकरी मुली आपली तक्रार घेऊन आमदार संतोष बांगर यांच्या कार्यालयात आल्या होत्या, शाळकरी विद्यार्थीीही होते
हिंगोली - शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि वाद हे जणू समीकरणच बनलं आहे. या अगोदर अनेकदा त्यांच्या वादग्रस्त भूमिकेचे आणि व्यवहाराचे व्हिडिओ समोर आल्याचं सोशल मीडियातून पाहायला मिळालं. आता, पुन्हा एकदा संतोष बांगर यांनी हिंगोली बस आगारातील कंडक्टरला चांगलाच दम भरलाय. मात्र, शालेय विद्यार्थींनींच्या तक्रारीनंतर आमदार संतोष बांगर यांनी ही भूमिका घेतल्याचं दिसून येतंय. शाळकरी मुलींनी कंडक्टरच्या गैरव्यवहाराबद्दल तक्रार दिली होती. त्यानंतर, आमदार बांगर यांनी आगार प्रमुखाला बोलावून त्यांच्या भाषेत समजावून सांगितलं.
हिंगोली जिल्ह्यातील शाळकरी मुली आपली तक्रार घेऊन आमदार संतोष बांगर यांच्या कार्यालयात आल्या होत्या, शाळकरी विद्यार्थीीही होते. 'दादा, आम्हाला गावाकडे जाण्यासाठी वेळेवर बस लागत नाही, त्यातही बसचा कंडक्टर वेडेवाकडं बोलतो, तुम्ही मुली आहेत म्हणून, मुले असता तर तुम्हाला मारलाच असता, असे म्हणतो. आम्ही कसा प्रवास करायचा?', अशा शब्दांत शाळेतील विद्यार्थिनींनी आपली पीडा आमदार संतोष बांगर यांच्यासमोर मांडील. त्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी तातडीने आगार प्रमुखांना बोलावून कंडक्टरबाबत त्यांना दम भरला. आमदार बांगर यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
तो कंडक्टर म्हणतो, तुमच्या बापाची बस आहे का, गाडीतून खाली उतरवीन. अशा कंडक्टरला मी पायाखालीच तुडवीन, तुम्हाला कल्पना आहे, मी जेवढा चांगलाय तेवढाच खराब आहे, असे म्हणत आमदार संतोब बांगर यांनी आगार प्रमुखाला कंडक्टरबाबत चांगलाच दम धरला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियातून समोर आला आहे.
त्या लेकरांची गैरसोय झाली नाही पाहिजे, बरोबर ४.३० वाजता बस तिथं आली पाहिजे, ५ वाजेपर्यंत हे सगळे गाडीत बसले पाहिजेत. तसेच, त्या मार्गावर चांगला माणूस त्या, हवं तर महिला कंडक्टर द्या किंवा एखादा बुजूर्ग माणूस द्या, असे म्हणत आमदार संतोष बांगर यांनी डेपो मॅनेजरला तंबी दिली. त्यावेळी, शाळेतील विद्यार्थींनीही आमदार बांगर यांच्यासमोरच होत्या.