अशीही कुरघोडी ! कार्यालयाची वीज तोडताच महसुलचा दणका;वीजवितरणची ३ कार्यालये सील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 06:52 PM2022-02-28T18:52:08+5:302022-02-28T18:55:08+5:30
विद्युत पुरवठा खंडित असल्याने आज दिवसभर तहसिल कार्यालयाचे कामकाज ठप्प होते.
वसमत: वीज बिलापोटी ७ लाख ४५ हजार थकल्याने वीजवितरण कंपनीने रविवारी तहसिल कार्यालयाची वीज जोडणी तोडली. तर आज ९ लाख ५४ हजाराचा अकृर्षीक कर थकल्याने महसुलने दणका देत वितरणच्या तिन्ही कार्यालयास सिल ठोकले आहे. दोन्ही विभागाने जशास तसे उत्तर दिल्याने शासकीय कार्यालयांच्या कुरघोडीची शहरात दिवसभर चर्चा होती.
वसमत शहरासह ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीने थकीत बिलापोटी वसुली करण्यावर भर दिला आहे.तसेच तहसिल विभाग अकृर्षीक कराची वसुलीभर देत आहे.तहसिल कार्यालयाकडे वीजबिला पोटी ७ लाख ४५ हाजार वितरणचे थकले होते तर वितरणचे शहर कार्यालय, ग्रामीण, वरिष्ठ अभियंता या तिन कार्यालयाकडे एकूण ९ लाख ५४ हाजार अकृर्षीक कर थकला आहे. महसुल विभागाने १५ दिवसांपूर्वी वितरणला अकृर्षीक कर भरणा करण्या संदर्भात नोटीसा बजावल्या होत्या. त्यानंतर वीजवितरण कंपनीच्या वसुली पथकाने २७ फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालयाचा विद्युत पुरवठा खंडित केला. आज दिवसभर तहसिल कार्यालयाचे कामकाज विजेअभावी ठप्प होते.
दुसरीकडे ही कारवाई जिव्हारी लागल्याने महसुलनेही वीजवितरण कंपनीला चांगलाच दणका दिला.२८ फेब्रुवारी सोमवार रोजी दुपारी तहसिलदार अरविंद बोळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी आर काळे, प्रियंका खडसे, तलाठी एस बोबडे यांनी ९ लाख ५४ हजाराच्या अकृर्षीक करापोटी वितरणच्या शहर अभियंता कार्यालय, ग्रामीण कार्यालय आणि वरिष्ठ अभियंता यांच्या कार्यालयास सिल ठोकले.
वीज वितरण कंपनी च्या तिन्ही कार्यालयाकडे ९ लाख ५४ हाजाराचे अकृर्षीक कर थकले आहे.१५ दिवसा पुर्वी करा संदर्भात नोटीसा बजावण्यात येऊन देखील वितरण गांभीर्य घेत नव्हते. यामुळे आज तिन्ही कार्यालयास सिल ठोकण्यात आले.
- आर बी काळे, मंडळ अधिकारी, वसमत
वीजवितरण कंपनी शहरासह ग्रामीण भागात विद्युत बिलाची वसुली करत आहे. तहसिल कार्यालयाकडे ७ लाख ४५ हाजार थकले आहे.विद्युत बिलापोटी रविवारी कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
- सचिन गच्चे, शहर अभियंता, वीज वितरण, वसमत