उन्हाळी भुईमुगानेही सोडली शेतकऱ्यांची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:22 AM2021-06-04T04:22:50+5:302021-06-04T04:22:50+5:30
करंजी : गतवर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपांतील नगदी पिके पूर्णत: पाण्यात गेली. असे असले तरी ...
करंजी : गतवर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपांतील नगदी पिके पूर्णत: पाण्यात गेली. असे असले तरी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई उन्हाळी भुईमूग भरून काढील असे वाटले होते. परंतु, पहिला टप्पा वगळता दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील भुईमुगाने शेतकऱ्यांची साथ सोडल्याचे करंजी व परिसरात पाहायला मिळत आहे.
शेतकऱ्यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. गतवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर, आदी नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतर शासनाने नुकसान भरपाई म्हणून मदतही जाहीर केली; परंतु शासनाची मदत काहींच्या पदरात पडली, तर काहींना अजूनही पदर पसरून बँकेेचे हेलपाटे मारावे लागत आहेत. आता खरीप हंगाम तोंडावर आला आहे. अजूनही शेतकऱ्यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
अतिवृष्टीने नुकसान झाल्यानंतर करंजी, दारेफळ, विरेगाव, बळेगाव, गुंडा, आदी दहा ते बारा गावांतील शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाची पेरणी केली. साडेतीन महिन्यांनंतर का होईना, पीक चांगले आले तर भाव मिळेल, असे शेतकऱ्यांना वाटले होते. यानंतर दहा ते बारा शेतकऱ्यांनी भुईमुगाचा पेराही घेतला. तीन-चार शेतकरी वगळता बाकी शेतकऱ्यांच्या पदरी भुईमुगाचा काढाच शिल्लक राहिला आहे. सुक्या शेंगांना पाच हजार तर ओल्या शेंगांना अडीच हजार भाव आज दिला जात असला तरी भुईमुगासाठी केेलेल्या खर्चाच्या मानाने तो कमीच असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मृग नक्षत्राची शेतकरी वाट पाहतोय....
करंजी व परिसरातील शेतकऱ्यांनी मशागत पूर्ण केली आहे. आता शेतकरी मृग नक्षत्राची वाट पाहत बसला आहे. या वर्षी मृग नक्षत्र चांगली साथ देईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. ज्या शेतकऱ्यांना अजूनही अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळालेली नाही, अशा शेतकऱ्यांना शासनाने खरीप हंगामात नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.