पाच हजाराची लाच घेताना प्रभारी अधीक्षक चतुर्भुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:30 AM2021-01-20T04:30:26+5:302021-01-20T04:30:26+5:30
हिंगोली : सातव्या वेतन आयोगाच्या वेतन फरकाच्या बिलाची छाननी करून शिक्षणाधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेऊन देतो. तसेच ते बिल औरंगाबाद ...
हिंगोली : सातव्या वेतन आयोगाच्या वेतन फरकाच्या बिलाची छाननी करून शिक्षणाधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेऊन देतो. तसेच ते बिल औरंगाबाद येथील उपसंचालकांकडे दाखल करतो. त्यासाठी पाच हजाराची मागणी करणाऱ्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयातील प्रभारी अधीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत रंगेहाथ पकडले. ही कारवाई १९ जानेवारी रोजी दुपारी १.४५ च्या सुमारास केली.
हिंगोली येथील वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयाकडे जिल्ह्यातील खासगी शाळांमधील शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयक, रजा व इतर देयक मंजूर करण्यासाठी पाठविले जाते. त्यानुसार वसमत येथील तक्रारदाराचे सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या हप्त्याचे १ लाख ४९ हजार ४४१ रुपयाचे थकीत देयक मंजुरीसाठी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयास पाठविण्यात आले होते. मात्र सातव्या वेतन आयोगाच्या वेतन फरकाच्या बिलाची छाननी करून शिक्षणाधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेतो. तसेच ते बिल उपसंचालक यांच्याकडे सादर करतो, म्हणून पाच हजार रुपयाची मागणी प्रभारी अधीक्षक भगवंत प्रशांत कपाळे (सहायक लेखाधिकारी) यांनी तक्रारदाराकडे केली होती. परंतु, तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नव्हती. म्हणून तक्रारदाराने दोन दिवसापूर्वी कपाळे यांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे केली होती. त्यानुसार प्रभारी पोलीस उपअधीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकाने या प्रकाराची सत्यता पडताळली. यावेळी कपाळे यांंनी पाच हजाराच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी १.४५ च्या सुमारास हिंगोली येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानाजवळ असलेल्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयात सापळा रचला. त्यानंतर तक्रारदाराकडून पाच हजार रुपयाच्या लाचेची रक्कम स्वीकारताना कपाळे यांना पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर लाच घेणाऱ्या सहायक लेखाधिकारी कपाळे यांना लाचलुचपत कार्यालयात आणण्यात आले. यावेळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
ही कामगिरी पोलीस अधीक्षिका कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस उपअधीक्षक नितीन देशमुख, पोलीस निरीक्षक ममता अफूने, सहायक पोलीस उपनिरीक्षक बुरकुले, विजयकुमार उपरे, संतोष दुमाणे, महारुद्र कवाडे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, विनोद देशमुख, अविनाश कीर्तनकार, प्रमोद थोरात यांच्या पथकाने केली.