शाळांच्या भौतिक सुविधांचा सर्व्हे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 11:15 PM2018-07-12T23:15:43+5:302018-07-12T23:16:01+5:30
जिल्ह्यातील जि. प. च्या शाळांची आॅनलाईन माहिती घेऊन संबधित अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक एकूण ८८३ शाळांचे कनिष्ठ अभियंत्याकडून आॅनलाईन सर्वेक्षण सुरू असून सदर माहिती अॅपद्वारे भरून घेतली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील जि. प. च्या शाळांची आॅनलाईन माहिती घेऊन संबधित अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक एकूण ८८३ शाळांचे कनिष्ठ अभियंत्याकडून आॅनलाईन सर्वेक्षण सुरू असून सदर माहिती अॅपद्वारे भरून घेतली जात आहे.
जिल्हा परिषद शाळांच्या अनेक इमारती जीर्ण झाल्या आहेत. मोडकळीस आलेल्या धोकादायक वर्गखोल्या तसेच इमारतींची डागडुजी केली जात आहे. आता शासनाने जिल्ह्यातील सर्वच शाळांतील भौतिक सुविधांचा आढावा घेऊन अद्ययावत माहिती शासनाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व शिक्षा अभियान मार्फत सध्या जिल्ह्यातील संबंधित कनिष्ठ अभियंत्याकडून शाळेतील भौतिक सुविधांची माहिती अॅपमध्ये भरून घेण्यात येत आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी नुकत्याच शिक्षण विभागास सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आता शाळांची माहिती भरून सदर अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणीकडे गांभीर्याने घेतले जात नाही. दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी कायद्यात तरतूद असली तरी, अनेक शाळांमध्ये भौतिक सुविधाच उपलब्ध नसतात. शाळेतील स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, खेळाच्या मैदानासह इतर भौतिक सुविधांकडे लक्ष देणे गरजेचे असते. परंतु प्रत्यक्षात मात्र या सुविधांकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु आता शाळांची सद्यस्थितीबाबत शासनाकडून अहवाल मागविण्यात आला आहे. त्यामुळे यंत्रणा कामाला लागली असून आॅनलाईन माहिती भरून घेण्याची कामे सुरू आहेत. शिवाय लिंकवर जाऊन संबंधित अभियंत्यांना शाळेच्या सद्यस्थितीचा आराखडा भरून द्यायचा आहे.
सर्व शिक्षा अभियान मार्फत शाळांची भौतिक सुविधां (स्ट्रक्चरल आॅडिट) अॅपद्वारे माहिती भरून घेण्यासाठी स्वतंत्र लिंक तयार केली आहे. ती ओपन करून माहिती भरायची आहे. प्रथम संबधित तालुका, त्यानंतर केंद्र व शाळेचे नाव, मुख्याध्यापकाचे नाव, मोबाईल नंबर, शाळेचा यूडायस क्रमांक, शाळेचा
प्रकार, पटसंख्या, मंजूर व कार्यरत शिक्षक, शाळेच्या जागेचे व इमारतीचे क्षेत्रफळ, उपलब्ध वर्गखोल्या तसेच वापरण्यायोग्य व मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा अशी माहिती भरून घेतली जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वच्छतागृह आहेत का? मोडकळीस किंवा वापरण्यायोग स्वच्छतागृह असेल तर त्याचा फोटो लिंकवर अटॅच करून घेण्यात येणार आहे.