फौजदारासह जमादार निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:59 AM2018-05-19T00:59:18+5:302018-05-19T00:59:18+5:30
वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत फौजदारासह जमादारावर लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रभारी पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी या दोघांच्याही निलंबनाचे आदेश काढले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत फौजदारासह जमादारावर लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रभारी पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी या दोघांच्याही निलंबनाचे आदेश काढले आहेत.
अपघाताच्या घटनेत जप्त करून हट्टा पोलीस ठाण्यात लावलेले ट्रॅक्टर सोडण्यासाठी फौजदार सिद्धोधन जोंधळे यास रंगेहाथ पकडले होते. तपासात यापूर्वी जमादार साहेबराव राठोड यानेही १५ हजारांची लाच घेतल्याचे समोर आले होते. तर कळंबा येथील सरपंच गरडनेही यात दलाली केल्याचा प्रकार उघड झाला होता. या प्रकरणात दोन्ही पोलिसांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनाच्या आब्रूची लक्तरे वेशीला टांगली गेली होती. शिवाय यापूर्वीही या अपघातातील सराफाकडील सोने गायब झाल्याचे प्रकरण गाजले होते. एकंदर पोलीस दलाची प्रतिमा मलीन करण्यास हे सर्व प्रकार कारणीभूत ठरले होते. यातील फौजदार व जमादारास प्रभारी पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी तत्काळ निलंबित करण्याचा आदेश काढला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात हे प्रकरण चवीने चर्चिले जात असल्याने गुंजाळ यांनी या घटनेचे गांभिर्य लक्षात घेता तडका-फडकी निलंबनाचे आदेश काढले आहेत.