सरपंचांच्या अपात्रतेला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:11 PM2018-10-12T23:11:52+5:302018-10-12T23:12:08+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील सरपंच नंदाबाई ठोंबरे यांच्या अपात्रतेला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे यांनी स्थगिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून या गावात तापलेल्या राजकारणामुळे ग्रामस्थ मात्र हैराण आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील सरपंच नंदाबाई ठोंबरे यांच्या अपात्रतेला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे यांनी स्थगिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून या गावात तापलेल्या राजकारणामुळे ग्रामस्थ मात्र हैराण आहेत.
शिरडशहापूर येथील सरपंच नंदाबाई ठोंबरे यांनी उपसरपंचांची निवड केली नसल्याचा आरोप करुन त्याविरोधात अप्पर आयुक्तांकडे दाद मागण्यात आली होती. त्यात विस्तार अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार अप्पर आयुक्तांनी ठोंबरे यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब केले होते. विशेष म्हणजे त्यानंतर गावात मिरवणूक, आतषबाजीचे प्रकारही घडले. यामुळे गावातील टोकाच्या राजकारणाची प्रचिती येते. आजी-माजी जि.प.सदस्यांचे गट हे राजकारण खेळत आहेत. मात्र एकमेकांना मात देण्यात हे प्रकरण पार मंत्रालयापर्यंत पोहोचले आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे यांच्याकडे क.३९(३) नुसार अपील दाखल केले आहे. प्रस्तुत प्रकरणात विभागीय आयुक्तांच्या २५ सप्टेंबर २0१८ रोजीच्या आदेशाला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती आदेश दिल्याचे पत्र अवर सचिव नीला रानडे यांनी १२ आॅक्टोबर रोजी काढले आहे. तर सुनावणीची तारीख लवकरच कळविण्यात येईल, असे म्हटले आहे.
जाणीवपूर्वक त्रास-ठोंबरे
मी जनतेतून निवडून आलेली सरपंच आहे. मात्र आदिवासी व महिला असल्याने जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. मी सीईओ, बीडीओंना चार ते पाचवेळा भेटले. आमच्या गावातील ग्रामसेविकेच्या अपहाराची तक्रार केली. परंतु त्याची चौकशी न करता माझ्याविरुद्धच चुकीचे अहवाल दिले. विरोधकांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. त्याची कुरुंदा पोलिसांत तक्रारही दिली. गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. कर्मचाºयांचा पगार नाही, ग्रामसेविकेचे लक्ष नाही. प्रशासन त्यांना साथ देत आहे. यापुढे गावाच्या विकासात अडथळा निर्माण केल्यास आदिवासी समाजाच्या संघटनांमार्फत आंदोलनाचा इशारा दिला.