स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली कृषी कार्यालयात तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 03:53 PM2020-06-23T15:53:49+5:302020-06-23T15:55:51+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वसमत सेनगाव आदी ठिकाणी कृषी विभागाकडे बियाणे न उगवल्याने निवेदने देऊन पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली होती.
हिंगोली: जिल्ह्यात यंदा सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी अधीक्षक कार्यालयात जाऊन तोडफोड करून शेतकऱ्यांना भरपाईची मागणी करण्यात आली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वसमत सेनगाव आदी ठिकाणी कृषी विभागाकडे बियाणे न उगवल्याने निवेदने देऊन पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र यात दिरंगाई होत असल्याचा आरोप करून आज स्वाभिमानीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन करताना कार्यकर्त्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयातील साहित्याची आदळआपट करुन नासधूस केली. त्याचबरोबर सरसकट शेतकऱ्यांना पीक विमा का मिळाला नाही? याबाबतही जाब विचारला. तर लोखंडे यांच्यासमोरच खुर्च्यांची तोडफोड केली.
यावेळी अधीक्षक विजय लोखंडे यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केली. लोखंडे यांनी सोयाबीन उगवले नसल्याच्या अनेक तक्रारी आल्याने आता उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी मंडळ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्याचा आदेश काढला आहे. जिल्हास्तरीय समितीला एवढ्या सगळ्या तक्रारींवर पाहणी करून निर्णय घेणे शक्य नाही. त्यामुळे मंडळ अधिकारी आता पाहणी करून अहवाल सादर करतील, असेही लोखंडे म्हणाले.