'स्वाधार'च्या विद्यार्थ्यांना निधीच्या आधाराची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:19 AM2021-07-19T04:19:51+5:302021-07-19T04:19:51+5:30

हिंगोली : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील २०१९-२० मधील बहुतांश पात्र विद्यार्थ्यांना अद्याप भोजन, निर्वाह व निवासासाठीची पूर्ण मदत ...

Swadhar students need funding base | 'स्वाधार'च्या विद्यार्थ्यांना निधीच्या आधाराची गरज

'स्वाधार'च्या विद्यार्थ्यांना निधीच्या आधाराची गरज

Next

हिंगोली : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील २०१९-२० मधील बहुतांश पात्र विद्यार्थ्यांना अद्याप भोजन, निर्वाह व निवासासाठीची पूर्ण मदत मिळाली नाही. त्यामुळे ‘स्वाधार’चा या विद्यार्थ्यांना केव्हा आधार मिळणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित होत आहे.

मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश दिला जातो. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत समाजकल्याण विभागामार्फत भोजन, निर्वाह व निवासासाठी ठरावीक रक्कम दिली जाते. या योजनेंतर्गत २०१९-२० मध्ये जिल्ह्यातील ६५२ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यांतील ३५४ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले होते. यांतील ३४६ पात्र विद्यार्थी व ११४ नियमित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिल्या हप्त्यापोटी एक कोटी १४ लाख १२ हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. मात्र त्यांना दुसरा हप्ता अद्याप मिळाला नाही. तसेच ४८ विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’चा पहिला व दुसरा हप्ता देण्याचे बाकी आहे. ही रक्कम थकल्याने विद्यार्थी समाजकल्याण कार्यालयात विचारणा करीत आहेत.

आवश्यकता ६५ लाखांची

स्वाधार योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्यापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना थकीत रकमेची प्रतीक्षा आहे. यासाठी ६५ लाख ३६ हजार रुपयांची आवश्यकता आहे. ही रक्कम उपलब्ध झाल्यास स्वाधार योजनेतील पात्र विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे.

कोरोनामुळे योजना थंड बस्त्यात

मागील दीड वर्षापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. याचा सर्वांत जास्त फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांसह व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना पूर्ण शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात जाता आले नाही. वसतिगृहही बंद ठेवावे लागले. याचा परिणाम स्वाधार योजनेवर झाला. दोन वर्षांपासून स्वाधार योजनेसाठी अर्जच मागविण्यात आले नाहीत.

अशी मिळते मदत

स्वाधार योजनेसाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना १०वी, १२वी, पदवी, पदविका परीक्षेमध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. दिव्याांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ५० टक्के आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, आदी मोठ्या शहरांत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व निर्वाह भत्त्यासाठी ६० हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाते. इतर महसूल विभाग व क वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ५१ हजार, तर उर्वरित ठिकाणच्या विद्यार्थ्यांसाठी ४३ हजार रुपयांपर्यंत भत्ता दिला जातो. या व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष पाच हजार व अन्य शाखांतील विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरूपात दिले जातात.

प्रतिक्रिया...

स्वाधार योजनेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना रक्कम उपलब्ध करून देण्यासंदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे. ही रक्कम उपलब्ध झाल्यानंतर त्वरित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

- शिवानंद मिनगिरे, साहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, हिंगोली

Web Title: Swadhar students need funding base

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.