अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्याने ‘युपीएससी’ मध्ये स्वप्नीलचे स्वप्न पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 08:35 PM2023-05-23T20:35:01+5:302023-05-23T20:35:10+5:30
जिद्द, चिकाटी, मोठ्यांचे आशिर्वाद आले फळा; पार्डीत आई-वडिलांचा सत्कार
इस्माईल जहागिरदार, वसमत: लहानपणापासून मी मोठा होऊन मोठी परीक्षा देणार, मोठा अधिकारी होणार, असे स्वप्नील बोलत असे. स्वप्नीलने अभ्यासात सातत्य ठेवल्यामुळे तो आज यशोशिखर गाठू शकला आहे. ‘यूपीएससी’ परीक्षेत त्याचे स्वप्न पूर्ण झाले, अशी प्रतिक्रिया सेवानिवृत्त पोलिस नायक चंद्रकांत बागल यांनी दिली.
यूपीएससी २०२२ चा निकाल २३ मे रोजी जाहीर झाला. यात वसमत तालुक्यातील पार्डी (बागल) येथील स्वप्निल चंद्रकांत बागल याने बाजी मारत देशात ५०४ वा क्रमांकाने येण्याचा मान मिळवला.
स्वप्नीलने दिल्ली येथे ‘यूपीएससी’ परीक्षा दिली. स्वप्नील हा लहानपणापासून अभ्यासात सातत्य ठेवत आला आहे. पाचवी वर्गात असताना स्वप्नील नवोदयची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याचवेळी त्याने मी पुढे चालून मोठी परीक्षा देणार आहे. तसेच मोठा अधिकारी होऊन आई-वडिलांचे नाव रोषण करणार आहे, असे सांगितले.
२३ मे रोजी ‘यूपीएससी’ चा निकाल लागला. यावेळी तालुक्यातील पार्डी (बागल) येथे फटाक्यांची अतिषबाजी करत स्वप्नीलच्या आई-वडिलांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. चंद्रकांत बागल यांना दोन मुले आहेत. स्वत: चंद्रकांत बागल हे उच्चशिक्षीत आहेत. त्यांची पत्नी आशाताई बागल याही उच्च शिक्षीत आहेत.
पार्डी बागल येथे फटक्यांची अतिषबाजी...
दिवाळी सणाला ज्या प्रमाणे फटाक्यांची अतिषबाजी केली जाते. त्या प्रमाणे पार्डी (बागल) येथे २३ मे रोजी स्वप्नील याने ‘यूपीएससी’ परीक्षेत यश मिळविल्याने फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली. गावात सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात होता. यावेळी गावकऱ्यांनी स्वप्नीलच्या आई-वडिलांचा पेढ्याचा घास भरवत फटाक्यांची अतिषबाजी करत सत्कार केला.