पापमोचणी एकादशीपासून ‘मिठाची’ यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:02 AM2019-03-31T00:02:24+5:302019-03-31T00:02:24+5:30
हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव या ठिकाणी १ एप्रिल पापमोचणी एकादशीपासून पंचक्रोशिमध्ये प्रसिद्ध असलेल्या मीठाच्या यात्रेस प्रारंभ होत असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन संस्थानकडून करण्यात आले आहे.
बापूराव इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव या ठिकाणी १ एप्रिल पापमोचणी एकादशीपासून पंचक्रोशिमध्ये प्रसिद्ध असलेल्या मीठाच्या यात्रेस प्रारंभ होत असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन संस्थानकडून करण्यात आले आहे.
श्री क्षेत्र नर्सी नामदेव हे ठिकाण संत नामदेवाची जन्मभूमी असून हे ठिकाणी पंचक्रोशीमध्ये सर्वदूर परिचीत आहे. या ठिकाणी दरवर्षी संत नामदेव महाराज यांच्या मंदिर परिसरामध्ये पापमोचनी एकादशीला यात्रा भरते. ही यात्रा मिठाची यात्रा म्हणूनही प्रसिद्ध आहे. १ एप्रिल पासून एकादशीला यात्रा महोत्सवाला प्रारंभ होत असून यात्रा महोत्सव काळामाध्ये महापुजा, नगर प्रदक्षिणा, कीर्तन, लाहीचा कार्यक्रम, महाप्रसाद इ. धार्मिक कार्यक्रमांसोबतच कुस्त्याचे आयोजन करण्यात आले आहे.
१ एप्रिल रोजी सकाळी ‘श्रीं’ची महापुजा संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार गजानन शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच २ रोजी दुपारी ३ वाजता ‘श्रीं’ची गावातून मुख्य मार्गाने पालखी नगर प्रदक्षिणा टाळ, मृदंगाच्या गजरात व नामदेव जनाबाईच्या जयघोषामध्ये निघणार आहे. तसेच यावेळी फडकऱ्याकडून सकाळी महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. ३ रोजी बुधवारी दुपारी १२ वाजता लाहीचा कार्यक्रम होईल. ७ एप्रिल रोजी रविवारी कुस्त्याची भव्य दंगल आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार गजानन शिंदे यांच्या हस्ते होणार असून यावेळी संस्थानचे सचिव सुभाष हुले, उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार, भारत महाराज, नवसाजी गुगळे, तसेच तुळशीराम काकडे, पांडुरंग टेकाळे, तुळशीराम गवते, सखाराम मोरे, सत्तारखॉ पठाण, विष्णू ढेंगडे, सुरेश काळे, दत्तराव वरणे, भिकाजी धाबे, भागवत सोळंके आदींसह पंचक्रोशीतील मान्यवर व कुस्ती प्रेमीची उपस्थिती राहणार आहे.
कुस्ती स्पर्धेचे प्रथम बक्षीस ७१०० रुपये, द्वितीय ५१०० रुपये, तृतीय ४१०० रुपये, चतुर्थ ३१०० रुपये, पाचवे २१००, सहावे १५००, सातवे ११०० रुपये ठेवण्यात आले आहे. तसेच काही उत्तेजनार्थ बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. तरी या स्पर्धेमध्ये पंचक्रोशीतील कुस्ती प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
नर्सी नामदेव येथील श्री संत नामदेव महाराज यांची यात्रा मागील अनेक वर्षापासून पापमोचनी एकादशीला भरत असून ही यात्रा मीठाची यात्रा म्हणून ओळखल्या जाते. यात्रेतील वैशिष्ट्य म्हणजे यात्रेमध्ये येणारे पंचक्रोशीतील भाविक यात्रेकरू हे येताना सोबत आंबाड्या, मोहऱ्या, ऐरंड्या, बीब, बरू, मटकी आदी धान्याच्या बदल्यात वर्षभर पुरेल एवढे मीठ खरेदी करतात. तर काही भाविक प्रसाद म्हणूनही मिठाची खरेदी करतात. ही पूर्वीपासून चालत आलेली परंपरा कायम आजही सुरू आहे. येथील मीठ हे थेट गुजरात येथून व्यापारी विक्रीसाठी घेऊन येतात, हे विशेष.