दांडेगावच्या केळीचा परदेशात गोडवा; इराण, इराक अन् दुबईच्या बाजारपेठेतून मोठी मागणी
By रमेश वाबळे | Published: July 10, 2023 03:18 PM2023-07-10T15:18:32+5:302023-07-10T15:20:17+5:30
नियोजन आणि मेहनतीच्या बळावर शेतकऱ्यांनी गाठली परदेशी बाजारपेठ
- विश्वास साळुंके
वारंगाफाटा (जि. हिंगोली) : एकापाठोपाठ येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे शेती व्यवसाय अडचणीत आल्याचे काही जण सांगतात. परंतु, या संकटांवर मात करीत काटेकोरपणे नियोजन आणि मेहनतीच्या बळावर कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव भागातील शेतकऱ्यांनी परदेशी बाजारपेठेत केळीचे उत्पादन पोहोचविले आहे. या केळीने थेट स्थानिक बाजारपेठांसह इराण, इराक, दुबईच्या बाजारपेठेतही गोडवा निर्माण केला आहे.
कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव, डोंगरकडा, सुकळी वीर, गुंडलवाडी, रेडगाव, वडगाव, जवळा पांचाळ या भागांत केळीकडे प्रमुख पीक म्हणून पाहिले जाते. बहुतांश शेतकरी आपल्याकडे असलेल्या शेतापैकी जवळपास ६० ते ७० टक्के क्षेत्रावर केळीची लागवड करतात. तर, इतर क्षेत्रावर हळद, ऊस व पारंपरिक पिके घेतली जातात. काटेकोर नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर या भागातील शेतकऱ्यांच्या केळीने स्थानिक बाजारपेठ तर काबीज केलीच. शिवाय आता परदेशाच्या बाजारपेठेतही गोडवा निर्माण केला आहे. कोरोनाकाळातील टाळेबंदीमुळे केळी अल्पदरात विकावी लागली. परंतु, शेतकऱ्यांनी न खचता उत्पादनात वाढ केली. आता दरवर्षी लाखो रुपयांचे उतीसंवर्धित केळीची रोपे विकत घेऊन लागवड केली जाते. या केळीचे योग्य नियोजन करून जोपासना करण्यात येते. दांडेगाव येथील काही शेतकऱ्यांच्या केळी जागतिक बाजारपेठेमध्ये निर्यात केली जात असून येथील केळीला परदेशातही मागणी वाढत आहे.
दोन ते अडीच हजारांचा भाव
बाजारपेठेत सध्या दांडेगावच्या केळीला दोन ते अडीच हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. शेतकरी शंकर साळुंके, दिलीपराव इंगोले यांनी उत्पादित केलेली केळी बाहेर देशात विक्रीसाठी जात आहे. एका कंपनीमार्फत शेतकऱ्यांची केळी इराण, इराक, दुबई आदी देशांत निर्यात करण्यात येत आहे. परदेशातील बाजारपेठेतही केळीला समाधानकारक भाव मिळत आहे.
समाधानकारक उत्पन्न...
दांडेगाव व कुरुंदा भागात केळीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली असून, या केळीला समाधानकारक भाव मिळत आहे. पूर्वी व्यापाऱ्यांकडून हमाली, कमिशनच्या नावाखाली कमी भाव मिळत होता. आता मात्र थेट कंपनीमार्फत केळीची निर्यात करण्यात येत असल्यामुळे आडत, हमाली, वाहतूक खर्च लागत नसल्याचे उत्पादक शेतकरी दिलीप इंगोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
इराणला १८ टन केळीची निर्यात
दांडेगाव शिवारातील १८ टन केळीची निर्यात इराणच्या बाजारपेठेत करण्यात आली आहे. संबंधित कंपनीमार्फत ही केळी पाठविण्यात आली असून, यातून सुमारे बारा ते पंधरा लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित असल्याचे शेतकरी शंकर साळुंके यांनी सांगितले. तसेच, केळीचे उत्पादन निर्यातक्षम व्हावे यासाठी शेतकऱ्यांना श्रीधर गावंडे, सागर कोपर्डीकर, ज्ञानेश्वर पाबळे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचेही साळुंके म्हणाले.