एप्रिलमध्ये रुग्णालयाचा घेणार आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:21 AM2018-03-13T00:21:11+5:302018-03-13T00:21:14+5:30
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा ढेपाळलेला कारभार काही केल्या सुधारत नसल्याचे चित्र आहे. शेवटी या ठिकाणी एप्रिल महिन्यात आरोग्य विभागाचे संचालक डॉ.संजीव कुमार हे येऊन आढावा घेणार आहेत. तर बेशिस्तीला लगाम घालण्यासाठीही पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा ढेपाळलेला कारभार काही केल्या सुधारत नसल्याचे चित्र आहे. शेवटी या ठिकाणी एप्रिल महिन्यात आरोग्य विभागाचे संचालक डॉ.संजीव कुमार हे येऊन आढावा घेणार आहेत. तर बेशिस्तीला लगाम घालण्यासाठीही पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून सामान्य रुग्णालयाबाबत सुरू असलेली ओरड खा.राजीव सातव यांच्यापर्यंतही पोहोचली. सातव यांनी याबाबत रुग्णालय प्रशासनालाही सूचना दिल्या आहेत. मात्र यात काही बदल होण्याची चिन्हे दिसत नसल्याने या रुग्णालयाला शिस्त लावण्यासाठी आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनीच येथे आढावा घ्यावा, असे त्यांनी सुचविले. त्यात एप्रिल महिन्यात हिंगोलीच्या सामान्य रुग्णालयात प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी संजीवकुमार येणार आहेत.
येथील रुग्णालयात डॉक्टरांची आधीच असलेली अपुरी संख्या व त्यात पाळले न जाणारे वेळापत्रक ही गंभीर बाब बनली आहे. इमारतीचे काम रखडल्याने प्रत्येक विभागाचा बाह्यरुग्ण विभाग स्वतंत्रपणे कार्यरत नाही. शस्त्रक्रिया कधी होत नाहीत. पूर्वी प्रसूतींचे प्रमाण चांगले होते. आता रेफरिंगकडे कल वाढला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या रुग्णालयात पाण्याची सुविधाही व्यवस्थित चालत नाही. कधी बंद तर कधी सुरू असते. स्वच्छतेचा व स्वच्छतागृहांचा प्रश्नही सोडविला जात नाही. रुग्णांची गैरसोय तर होतेच शिवाय डॉक्टर व कर्मचाºयांसाठीही स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही. तर सामान्य रुग्णालयासाठीचे १ कोटी तेथे खर्च होणे शक्य नसेल तर कळमनुरी रुग्णालयाच्या फर्निचरला देण्याची सूचना दिल्याचेही ते म्हणाले.
औषधीचा प्रश्न कायम
जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांना लागणाºया साहित्याची उसनवारी करून काम चालविले जात असले तरीही रुग्णांना औषधी मात्र मिळत नसल्याने याची उसनवारी काही केली जात नाही. औषधीही आजूबाजूच्या जिल्ह्यांतून आणली तर किमान रुग्णांना बाहेरून औषध आणण्याची गरज पडणार नाही. मात्र त्या जिल्ह्यांतही हीच परिस्थिती आहे. कारण केंद्रीय पद्धतीने औषधी खरेदी होत नाही. तर शासकीय कंपनी असलेल्या हापकिन्सकडे रक्कम वर्ग करणाºयांना सहा महिन्यांची प्रतीक्षा करूनही अजून औषधी मिळाली नाही, हीच खरी समस्या आहे.
उपकेंद्रांना डॉक्टर द्या
आरोग्य उपकेंद्रांमध्ये बीएएमएस डॉक्टर द्यावेत, अशी मागणी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. हिंगोलीत यासाठी १२५ बीएएमएस डॉक्टरांची पदनिर्मिती करा,यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही खा.सातव यांनी सांगितले. यात यश येईल, असा आशावादही व्यक्त केला.