महसूल विभाग हादरला, डोळ्यात मिरची पूड फेकून तलाठ्याची कार्यालयात भोसकून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 04:19 PM2024-08-28T16:19:05+5:302024-08-28T16:21:07+5:30

उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू; एका हल्लेखोरास पोलिसांनी घेतले ताब्यात

Talathi was stabbed to death by throwing chilli powder in his eyes; shock over the incident in Wasmat taluka | महसूल विभाग हादरला, डोळ्यात मिरची पूड फेकून तलाठ्याची कार्यालयात भोसकून हत्या

महसूल विभाग हादरला, डोळ्यात मिरची पूड फेकून तलाठ्याची कार्यालयात भोसकून हत्या

- अरूण चव्हाण
आडगाव रंजे. (जि.हिंगोली) :
वसमत तालुक्यातील आडगाव (रंजेबुआ) येथील तलाठी कार्यालयात प्रलंबित शेती कामानिमित्त आलेल्या एकाने तलाठ्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून चाकूहल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या तलाठ्याचा परभणीकडे उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना २८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.

वसमत तालुक्यातील आडगाव (रंजे.) येथे २८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास तलाठी संतोष पवार  (वय ३६) हे सज्जा कार्यालयात काम करत बसले होते. येथे बोरी सांवत येथील एकजण त्यांच्याकडे प्रलंबित शेतीच्या कामासाठी आले होते. तलाठी व त्यांच्यात बाचाबाची झाली. यात तलाठी पवार यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकत त्यांच्यावर धारधार चाकूने वार केले. तलाठी कार्यालयात काय प्रकार घडला हे कळताच नागरिकांनी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तलाठी संतोष पवार यांना उपचारासाठी परभणीकडे हलविण्यात येत होते. परंतु, त्याचा वाटेतच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी मारोती थोरात,  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी भेट दिली. दरम्यान, एका हल्लेखोरास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याप्रकरणी दुपारी ४ वाजेपर्यंत हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. तर आडगाव रंजे. येथे पोलिसांचे पथक तळ ठोकून आहे.

Web Title: Talathi was stabbed to death by throwing chilli powder in his eyes; shock over the incident in Wasmat taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.