वळणावर नियंत्रण सुटल्याने टँकर मोपेडवर कोसळला; मोपेडस्वार गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 07:28 PM2021-11-18T19:28:59+5:302021-11-18T19:29:36+5:30
चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर मोपेडला धडकून देऊन पुढे उच्चदाब विद्युत वाहिनीच्या खांब्याला धडकत रस्त्याकडेला उलटला.
औंढा नागनाथ: हिंगोलीकडे केमिकल घेऊन जाणारा भरधाव वेगातील टँकर वळणावर नियंत्रण सुटल्याने रस्ताच्याकडेला उलटला. दरम्यान, याचवेळी तेथून जाणाऱ्या मोपेडवर टँकर उलटल्याने मोपेडस्वार गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज सायंकाळी पाच वाजता पिंपळदरी फाट्यावर झाला.
औंढ्याकडून हिंगोलीकडे एक टँकर (एमपी ०९ ए जी ५०७६ ) केमिकल घेऊन जात होते. तर, राघबुवा तळेगावकर हे बाजारकरून मोपेडवरून गावाकडे जात होते. दरम्यान, पिंपळदरी फाट्यावर वळण घेताच चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर मोपेडला धडकून देऊन पुढे उच्चदाब विद्युत वाहिनीच्या खांब्याला धडकत रस्त्याकडेला उलटला. यावेळी टँकरखाली आल्याने मोपेडचा चुराडा झाला. या भीषण अपघातात सुदैवाने मोपेडस्वार तळेगावकर यांचा जीव वाचला मात्र, ते गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर टँकरमधून केमिकल गळती होत होती. अपघातानंतर टँकर चालकाने पळ काढला.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, जमादार अफसर पठाण, गजानन गिरी, रवी इंगोले, संतोष धनवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मोपेडस्वार राघवबुवा किसन तळेगावकर (५० ) यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.