तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष निवडीवरून 'तंटा'; माजी अध्यक्षाचा लोखंडी रॉडच्या मारहाणीत मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 06:49 PM2024-10-16T18:49:16+5:302024-10-16T18:50:06+5:30
नवीन तंटामुक्त समितीचा अध्यक्ष होण्याच्या कारणावरून चावडीवर केली माजी अध्यक्षाला लोखंडी रॉडने मारहाण
- रमेश कदम
आखाडा बाळापुर ( हिंगोली): तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून माळधावंडा येथे मोठा 'तंटा' उभा राहून माजी अध्यक्षाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
याप्रकरणी पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील माळधावंडा या गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. गावातील माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आनंदराव मस्के हे १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते ६ : ३० वाजण्याच्या सुमारास गावातील तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोरील चावडीवर मुलगा अभिषेकसह बसले होते. त्यावेळी संगनमत करून काहीजण तिथे आले. त्यांनी बाळासाहेब मस्के यांच्यासोबत तंटामुक्ती अध्यक् निवडीवरून आणि मागील भांडणावरून वाद घातला. तसेच अचानक लोखंडी रॉड, लाकडी काठीने मारहाण केली. यात बाळासाहेब मस्के, अभिषेक मस्के गंभीर जखमी झाले. प्रकृती गंभीर असल्याने बाळासाहेब मस्के यांना नांदेड येथील खाजगी रुग्णालयात अधिकच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असताना त्यांचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला.
या प्रकरणी अभिषेक बाळासाहेब मस्के यांच्या फिर्यादीवरून शंकरराव भगवानराव मस्के , विकास शंकरराव मस्के, अविनाश शंकरराव मस्के, उर्मिलाबाई शंकरराव मस्के , विद्या विकास मस्के , रूपाली अविनाश मस्के , दिलीपराव भगवानराव मस्के, भुजंगराव दिलीपराव मस्के (सर्व राहणार माळधांडा तालुका कळमनुरी) यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 109 , 103 (1 ) , 189 ( 2 ) , 191( 2 ) , 191 ( 3 ) , 190 , 352 , 351 ( 2 ) ( 3 ) , 54 , 118 ( 1 ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे करीत आहेत. तंटामुक्ती अध्यक्ष होण्याच्या कारणावरून माजी तंटामुक्ती अध्यक्षांचा खून केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गावागावातील वाद गावातच मिटवण्यासाठी व गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी गृह विभागाने निर्माण केलेल्या तंटामुक्त ग्राम समित्यावादाचे कारण ठरल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.