यंदा नवीन २,८८० नवीन बचत गट स्थापनेचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:20 AM2021-06-24T04:20:47+5:302021-06-24T04:20:47+5:30
यंदा कोरोनामुळे बचत गट स्थापनेसाठी अडचणी उभ्या राहत होत्या. त्यामुळे सुरुवातीच्या काही काळात काम करता आले नाही. आता शासनानेच ...
यंदा कोरोनामुळे बचत गट स्थापनेसाठी अडचणी उभ्या राहत होत्या. त्यामुळे सुरुवातीच्या काही काळात काम करता आले नाही. आता शासनानेच या कामाला काही काळ ब्रेक लावल्याने आणखी काही दिवसांनी पुन्हा हे काम सुरू केले जाणार आहे. यामध्ये हिंगोली, कळमनुरी व वसमत तालुक्याला प्रत्येकी ५९५, तर औंढा ५७०, सेनगाव ५२५, असे तालुकानिहाय उद्दिष्ट आहे, तर स्थापन गटांची संख्या हिंगोली १६, कळमनुरी ३४, वसमत ३४, औंढा २८ व सेनगाव १८, अशी आहे. या बचत गटांची नवीन स्थापना झाल्याने त्यांना १५ हजार प्रत्येकी फिरता निधी वाटप करण्यात येत आहे. जसा निधी शासनाकडून येईल, तशी नवीन बचत गटांना आता मंजुरी दिली जाणार आहे. त्यानंतर सहा महिन्यांनी बँकांकडून त्यांना १ लाखापर्यंतचे कर्ज मिळू शकते, तर त्याची परतफेड योग्य वेळेत केल्यास दुसऱ्या टप्प्यात २.५ लाखांचे कर्ज देता येते. बचत गट जसजसे सक्षम होतील, त्या प्रमाणात पुढे कर्ज मिळण्याची व्यवस्था आहे.
आता नवीन बचत गट स्थापनेसाठी महिला पुढाकार घेत असल्याचे दिसत आहे. कृषी, अन्नप्रक्रिया आदींमध्ये महिला बचत गटांना प्राधान्य दिले जात आहे. विविध अनुदानाच्या योजनाही शासन राबवत आहे. त्याचा फायदा या बचत गटांना होत आहे. त्यामुळे या बचत गट स्थापनेकडे कल वाढला आहे.