स्वयंपाकाची चव महागली; मसाला दरात दुप्पट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:34 AM2021-08-21T04:34:29+5:302021-08-21T04:34:29+5:30
हिंगोली : गॅससह खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे किचनमधील बजेट कोलमडले. त्यात मसाले पदार्थाच्या किमतीत वाढ झाल्याने स्वयंपाक ...
हिंगोली : गॅससह खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे किचनमधील बजेट कोलमडले. त्यात मसाले पदार्थाच्या किमतीत वाढ झाल्याने स्वयंपाक बेचव झाल्याचे पहावयास मिळत आहे.
इंधन दरवाढीमुळे महागाईत भर पडली आहे. वाहतूक खर्चाच्या नावाखाली इतर वस्तूंचेही दर वाढत असताना त्यात मसाले पदार्थाची भर पडली आहे. गतवर्षीपेक्षा दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. मसाल्याशिवाय स्वयंपाकाला चव येत नाही. त्यामुळे मसाला महाग झाला तरी चवदार स्वयंपाकासाठी मसाला वापरावाच लागत आहे. यात महिन्याचे बजेट कोलमडत असल्याने गृहिणी महागाईने त्रस्त झाल्या आहेत. महागाई पाठ सोडेना ! दोन वर्षांपूर्वीचे आणि आताचे मसाल्याच्या दरात खूप तफावत आहे. वर्ष, सहा महिन्यांसाठी एकदाच मसाला करून ठेवला जात होता. आता दुप्पट पैसे लागत आहेत. त्यामुळे सवडीनुसारच मसाला बनविला जात आहे. महागाईने सर्वसामान्य त्रस्त आहेत.
-प्राची उबारे, गृहिणी गॅस, खाद्यतेलासह इंधन दराने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात मसाले पदार्थाचे दर वाढल्याने स्वयंपाक घरातील महिन्याचे बजेट वाढले आहे. मसाल्याशिवाय स्वयंपाकाला चव येत नसल्याने मसाला महाग झाला तरी घ्यावाच लागत आहे.
-सीमा घुगे, गृहिणी म्हणून वाढले मसाल्यांचे दर इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. दीड वर्षात मसाले पदार्थाच्या आयातीवरही परिणाम झाला. इतर देशातून येणारे मसाल्याचे पदार्थांचे दर दुपटीने वाढले आहेत. पॅकिंग मसाल्याचे दर मात्र स्थिर असल्याचे मसाला विक्रेत्याने सांगितले. इंधन दरवाढीने वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे मसाल्याच्या पदार्थाच्या किमतीही वाढल्या असून काही पदार्थांचे दर मात्र स्थिर आहेत. तरीही मसाल्याला मागणी कायम आहे.
- शेख जलील बागवान, व्यापारी