नवोदयच्या ‘त्या’ शिक्षकाचीही बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:29 AM2018-03-19T00:29:36+5:302018-03-19T00:29:36+5:30
येथील नवोदय विद्यालयात विद्यार्थिंनींशी गैरवर्तन प्रकरणातील दुसऱ्या एका शिक्षकालाही तडकाफडकी नौशारी (गुजरात) येथील नवोदयमध्ये जोडण्यात आले आहे. यापूर्वी एकास कच्छ (गुजरात) येथे पाठविले. नवोदय प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, ही प्राथमिक कारवाई असल्याचे वृत्त आहे. लोकमतने सदर प्रकरणाचा वेळोवेळी पाठपुराव केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : येथील नवोदय विद्यालयात विद्यार्थिंनींशी गैरवर्तन प्रकरणातील दुसऱ्या एका शिक्षकालाही तडकाफडकी नौशारी (गुजरात) येथील नवोदयमध्ये जोडण्यात आले आहे. यापूर्वी एकास कच्छ (गुजरात) येथे पाठविले. नवोदय प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, ही प्राथमिक कारवाई असल्याचे वृत्त आहे. लोकमतने सदर प्रकरणाचा वेळोवेळी पाठपुराव केला.
वसमत नवोदय विद्यालयात कार्यरत शिक्षक जी.एस. उमाटे व ए.व्ही. तायडे या दोन शिक्षकांनी विद्यालयातील विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. सदर मुलींनी प्राचार्यांकडे लेखी तक्रारी दिल्या. प्राचार्यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र पोलिसांनी प्रकरणास गांभीर्याने घेतले नाही. प्रकरण मिटवण्यासाठी स्थानिकचे अनेक दलालही सक्रिय झाल्याची चर्चा आहे. ‘लोकमत’ने या प्रकरणाचा पाठपुरावा करताच प्रशाससनाने गांभीर्याने दखल घेत या प्रकरणातील शिक्षक ए. व्ही. तायडे याची कच्छ (गुजरात) येथे तडकाफडकी रवानगी केली. तर दुसरा शिक्षक जी.एस.उमाटे यांच्यावरही बदलीची कारवाईचे पत्र रविवारी धडकले. उमाटे ची बदली नौशारी (गुजरात) नवोदयमध्ये केल्याचे पत्रात नमूद आहे. मात्र उमाटे हजर नसल्याने बदलीचे पत्र त्यांच्या घराच्या दरवाजावर लावण्यात आले आहे.
विद्यार्थिनींशी गैरवर्तन करून शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणारी ही घटना आहे. या प्रकरणात आरोपी कारवाईसाठी समोर येण्याऐवजी काही दलाल गैरवर्तन करणाºया शिक्षकांच्या बाजूने उभे राहत असल्याचा किळसवाना प्रकारही पहावयास मिळत आहे. रविवारी दिवसभर पालकांची गर्दी नवोदयमध्ये होती. अनेक पालकांनी चिंता व्यक्त केली व ‘लोकमत’ ने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले. प्राचार्य लक्ष्मणन् यांच्याशी संपर्क साधला असता नवोदय प्रशासनाने दोन्ही शिक्षकांना तडकाफडकी गुजरात राज्यातील नवोदयमध्ये अटॅचची कारवाई केली आहे. पुढील चौकशी पूर्ण झाल्यानंतरच अंतिम कारवाई प्रशासन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.