निधीअभावी शिक्षकांचे पुरस्कार वितरण होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:20 AM2021-06-24T04:20:46+5:302021-06-24T04:20:46+5:30
हिंगोली जिल्ह्यात २०२० - २१ या वर्षातील ९ शिक्षकांना पुरस्कार घोषित झाले आहेत. समाजमाध्यमांवर ही यादी फिरत आहे. मात्र, ...
हिंगोली जिल्ह्यात २०२० - २१ या वर्षातील ९ शिक्षकांना पुरस्कार घोषित झाले आहेत. समाजमाध्यमांवर ही यादी फिरत आहे. मात्र, यातील अनेक शिक्षकांना कोणी अधिकृतरित्या सांगितले नसल्याने त्यांना हा पुरस्कार खरेच जाहीर झाला की नाही, याविषयी संभ्रम आहे. काहींचे मात्र या पत्रावरूनच सत्कारही झाले. मात्र, हे पुरस्कार जिल्हा परिषद कधी वितरित करणार आहे, हा प्रश्नच आहे. याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता या पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी ठेवलेली रक्कम इतरत्र खर्च झाल्याने हा कार्यक्रम घेता आला नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये एकूण ९ शिक्षकांची निवड झाली आहे. यात प्राथमिकचे ५, माध्यमिक ३ व विषय शिक्षक एक आहे. जिल्हा स्तरावरील समितीने शिफारस केल्याप्रमाणे ही निवड झाली आहे. १५ सप्टेंबर २०२० रोजीच निवड झाली असली तरीही जिल्हा परिषदेला हे पत्र २६ एप्रिल २०२१ रोजी प्राप्त झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता योग्य त्या उपाययोजना करून पुरस्कार वितरणाची सूचना दिली होती. याबाबत शिक्षक संघटनेचे व्ही. डी. देशमुख यांनी शिक्षकांना लवकर पुरस्कार वितरणाची मागणी केली.
यांची झाली निवड
पुरस्कारसाठी प्राथमिकमधून येहळेगाव सोळंकेच्या सुनीता रामा खुडे, सिरसम बु.च्या उर्मिला भिकय्या कीर्तनकार, बाळापूरवाडीचे सुरेश राजाराम पांचाळ, सेलूच्या रेणुका चंद्रकांत पांचाळ, ब्राह्मणवाडाचे प्रकाश गंगाधर घ्यार, माध्यमिकमधून केेंद्रा बु.चे गणेश राजाराम सोनावणे, कुरुंद्याचे विलास गोपा जाधव, जवळा बाजारचे रमेश नाथराव चव्हाण, तर विशेष शिक्षक म्हणून पातोंडाच्या करुणा मारोतीराव येवले यांची निवड झाली आहे.