'त्या कार्यक्रमात अनेक नेते उपस्थित होते, पण फक्त माझाचा व्हिडिओ व्हायरल केला'; आमदार राजू नवघरेंचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 01:21 PM2021-10-14T13:21:39+5:302021-10-14T14:07:23+5:30
'मी एकट्यानंच पाप केलं असेल तर त्यासाठी फाशीला जायला तयार आहे.'
हिंगोली: वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा काल दाखल झाला. शहरात दाखल होताना ट्रकमध्येच असलेल्या पुतळ्याची तालुक्याचे आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मात्र या वेळेचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये आमदार राजू नवघरे पुतळ्यावर चढून महाराजांना हार घालताना दिसत आहेत. व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आमदारावर टीका होऊ लागली. पण, आपल्याकडून चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर आमदारांनी जाहीर माफी देखील मागितली. तसेच, माफी मागताना आमदारांना यांना आपले अश्रू अनावर झाले.
हिंगोलीच्या वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्नाकृती पुतळा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मात्र, असं करताना राजू नवघरे यांनी अश्वावर उभं राहून महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केला. विशेष म्हणजे, यावेळी शिवसेनेचे माजी आमदार जयप्रकाश मुंदडा हे देखील उपस्थित होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.
राजू नवघरेंना अश्रू अनावर...
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार आमदार राजू नवघरेंवर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली. यानंतर माध्यमांसमोर येऊन त्यांनी स्पष्टीकरण दिले. यावेळी बोलत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. 'पुष्पहार अर्पण करताना सर्वच पक्षाच्या लोकांनी मला तिथे जायला सांगितलं होतं. मी म्हटलं राजकीय माणसाला वर पाठवू नका, पण मला त्यांनी अखेर वर चढवलं. पुतळ्याची उंची 16 फूटांची आहे. मी तिथे पुष्पगुच्छ वाहिले आणि खाली आलो. विविध पक्षाचे नेते तिथे होते. पण माझ्या एकट्याचाच पाय तिथे लावल्याचं दाखवलं जातंय. जर मी कुठे चुकलो असेन तर त्यासाठी मी माफी मागतो. माझ्यासारखा एक कार्यकर्ता आमदार झाला, तर त्याच्याविरोधात सगळे पेटून उठायचं काम करत आहेत', असं सांगताना नवघरेंना अश्रू आवरले नाहीत.
...तर फाशीही जाईल
कार्यक्रमात अनेक नेते उपस्थित होते. पण, मी एकटाच चढलो असं दाखवलं जात आहे. मी एकट्यानंच पाप केलं असेल तर मी त्यासाठी फाशीला जायला तयार आहे. पण माझी काहीही चूक नसताना आमदार झाल्यापासून मला त्रास देण्याचं काम केलं जातय. विनाकारण माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करू नका' असंही राजू नवघरे यावेळी म्हणाले.