नांदेडची प्रयोगशाळेत तांत्रिक अडचण; आता अँटीजनवरच हिंगोली जिल्ह्याची भिस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 07:05 PM2020-09-16T19:05:52+5:302020-09-16T19:07:39+5:30
हिंगोलीत उभारण्यात येत असलेल्या प्रयोगशाळेची मशिन गुरुवारी येणार असून ती कार्यान्वित होण्यास १२ दिवस लागणार आहेत.
हिंगोली : नांदेड येथील आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळेच्या अडचणीमुळे हिंगोली जिल्ह्यातील थ्रोट स्वॅब सात ते आठ दिवस प्रलंबित राहात असून आणखी तीन दिवस ही समस्या कायम राहणार आहे. हिंगोलीत उभारण्यात येत असलेल्या प्रयोगशाळेची मशिन गुरुवारी येणार असून ती कार्यान्वित होण्यास १२ दिवस लागणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोग्य यंत्रणेची साधने अपुरी पडू लागली आहेत. खाटा मिळेनात, आॅक्सिजन मिळेना, इंजेक्शन मिळेना अशा समस्या आजवर होत्या. आता त्यात आरटीपीसीआर चाचणीही होत नसल्याच्या नव्या समस्येची भर पडली आहे. त्याचा परिणाम म्हणून मागील दोन -तीन दिवसांपासून हिंगोलीच्या चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. झटपट चाचणी म्हणून अँटीजनचा आधार घेतला जात आहे. मात्र त्यापेक्षा जास्त आरटीपीसीआर चाचणीवर भरवसा असल्याने या चाचणीकडेच बहुतांश जणांचा कल आहे. असे असले तरीही ही चाचणीही होण्यास आता सात ते आठ दिवसांचा काळ लागत आहे. त्यामुळे तोपर्यंत या रुग्णावर उपचार करायचे तरी कसे? असा प्रश्न निर्माण होत आहे. अँटीजन चाचणीत पॉझिटिव्ह आल्यास निदान उपचार तरी सुरू करता येतील म्हणून सध्या या चाचण्यांवर भर दिला जात आहे.
मागील दोन महिन्यांपासून येथील आॅक्सिजन प्लांट व आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे काम सुरू आहे. किरकोळ कामे पूर्ण झाली नसल्याने या कामाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना दोनदा भेट द्यावी लागली. त्यांनी अतिशय कडक शब्दांत संबंधितांचे कान टोचल्यावर या कामाला गती आली. आता आॅक्सिजनचा टँक बसविला. मात्र मशिन व पाईपलाईनचे काम होण्यास आणखी सहा दिवस लागतील. पूर्वीची पाईपलाईन वापरात येणार नाही, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र ती वापरात येईल, असे सांगितले जात आहे. मशिन कार्यान्वित होताच आॅक्सिजन उपलब्ध होण्यासाठी आॅक्सिजनची आॅर्डर उद्या देणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.
गुरुवारी येणार मशीन; नंतर केंद्राचे पथक
हिंगोलीतील आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा मंजूर करण्यासाठी खा.राजीव सातव यांच्या पाठपुराव्यानंतर पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी जिल्हा नियोजनमधून निधी मंजूर केला होता. त्यानंतर हे काम मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे.४कामाला विलंबामुळे मोठी ओरड होत आहे. यात चार दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर किरकोळ कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. अन्यथा आणखी किती दिवस लागतील, याचा काही नेम नव्हता असेच चित्र आहे.४याबाबात विचारले असता जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले, प्रयोगशाळेसाठी लागणारी मशिन आता गुरुवारी हिंगोलीत दाखल होणार आहे. त्यानंतर ती प्रयोगशाळेत बसवून पूर्ण यंत्रणा सज्ज करायला किमान चार दिवस लागतील. ती सज्ज झाली की तत्काळ केंद्राचे पथक पाहणी करायला येईल. त्यांच्या परवानगीनंतरच ही प्रयोगशाळा सुरू करता येणार आहे. त्यासाठी एकूण दहा ते बारा दिवसांचा काळ जाणार आहे. त्यानंतरच हिंगोलीत प्रयोगशाळा कार्यान्वित होणार आहे.