प्रशिक्षणाचा ‘खेळ ’ करणाऱ्या गुरुजींवर तहसीलदारांनी उगारली ‘छडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:30 AM2021-01-03T04:30:22+5:302021-01-03T04:30:22+5:30

प्रशिक्षणाचा ‘खेळ’ करणाऱ्या गुरुजींवर तहसीलदारांनी उगारली ‘छडी’ प्रशिक्षणाबाहेर भटकणाऱ्या गुरुजींची घेतली ‘झाडाझडती’ रमेश कदम आखाडा बाळापूर : निवडणुकीचे प्रशिक्षण ...

Tehsildar lashes out at Guruji | प्रशिक्षणाचा ‘खेळ ’ करणाऱ्या गुरुजींवर तहसीलदारांनी उगारली ‘छडी’

प्रशिक्षणाचा ‘खेळ ’ करणाऱ्या गुरुजींवर तहसीलदारांनी उगारली ‘छडी’

Next

प्रशिक्षणाचा ‘खेळ’ करणाऱ्या गुरुजींवर तहसीलदारांनी उगारली ‘छडी’

प्रशिक्षणाबाहेर भटकणाऱ्या गुरुजींची घेतली ‘झाडाझडती’

रमेश कदम

आखाडा बाळापूर : निवडणुकीचे प्रशिक्षण ठिकाणी हजेरीची स्वाक्षरी मारून बाहेर गप्पांचे फड रंगवणाऱ्या गुरुजींवर तहसीलदारांनी शिस्तीची ‘छडी’ उगारली. प्रशिक्षणाचा ‘खेळ’ करू पाहणाऱ्या गुरुजींना शिस्तीचा बडगा दाखवत कारवाईचा इशारा दिल्यानंतर निवडणुकीचे प्रशिक्षण सुरळीत पार पडले.

कळमनुरी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू होते. कळमनुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहाच्या इमारतीत सकाळी दहा वाजल्यापासून प्रशिक्षण सुरू होणार होते. परंतु नेहमीची सवय असलेल्या ‘लेट लतीफ’ गुरुजींनी अकरा वाजेपर्यंत उपस्थितीची नोंदणीच सुरू ठेवली. त्यानंतरही प्रशिक्षण हॉलमध्ये बसण्याऐवजी बाहेरच सुख दुःखाच्या आणि एकमेकांना खिजवणाऱ्या गप्पांचे फड रंगले. कसेबसे त्यांना मधे ढकलत प्रशिक्षणाला सुरुवात केली. परंतु निवडणुका येतात, निवडणुका जातात. त्याच त्या प्रकारचे प्रशिक्षण घेऊन ‘निब्बर ’ झालेल्या गुरुजींना प्रशिक्षणात रसच नव्हता. महिला शिक्षिकांनी तर गेल्या कित्येक महिन्यापासूनच्या साचलेल्या गप्पा मोठ्या प्रवाहितपणे सुरू ठेवल्या. त्यामुळे प्रशिक्षणाचा आवाज दबला आणि गप्पाचा आवाज जोरात सुरू झाला. या सगळ्या बाबी पाहिल्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी महिला शिक्षकांना चांगलेच सुनावले. शिक्षकांना दरडावणारा व शिस्त सांगणारा अधिकारी या प्रशिक्षणात पहायला मिळाला. त्यांच्या दरडावण्यालाही या महिला दाद देत नव्हत्या. खाली मान घालून गप्पा सुरूच...गप्पा काही थांबत नव्हत्या. अखेर महसूल कर्मचाऱ्यांना पाठवून त्या महिलांचे नाव व शाळेचे नाव नोंद करा. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी तंबी दिल्यानंतर आवाज काहीसा दबला. वारंवार या महिलांना पाठीमागे गप्पा न मारता पुढच्या जागेत येण्याच्या सूचना दिल्यानंतरही महिला शिक्षिका जागच्या हल्ल्यासुद्धा नाहीत. गुरुजींची ही धिटाई महसूल प्रशासनाला अचंबित करणारी होती. हा सगळा प्रशिक्षणाचा ‘खेळ’ पाहून कळमनुरीचे तहसीलदार दत्तू शेवाळे मंचावरून खाली उतरले. गप्पा मारणाऱ्या महिलांना जागेवरून उठवून समोर बसण्यास भाग पाडले. त्यानंतर प्रशिक्षण शिस्तीत झाले पाहिजे यासाठी महसूल प्रशासनाने ‘पोलिसी खाक्यात’ वर्तन सुरू केले. प्रशिक्षण स्थळाच्या बाहेर पटांगणात गुरुजी पुड्या खाऊन गप्पात रंगले होते. त्यावेळी तहसीलदारांनी स्वतः सर्वत्र फेरफटका मारून बाहेर थांबलेल्या गुरुजींची चांगलीच झाडाझडती घेतली. बाहेर का थांबलात?, प्रशिक्षण कुणासाठी आहे? असे सांगत खडे बोल सुनावले. तहसीलदार यांचा हा अवतार पाहिल्यानंतर अनेक गुरुजींनी कातर मारत सभागृहात धाव घेतली. तर काही गुरुजी ‘माझं प्रशिक्षण दुपारी असल्याचं चक्क खोटं सांगताना’ आढळले. एकंदरीत निवडणुकीच्या प्रशिक्षणाचा ‘खेळ ’ करू पाहणाऱ्या गुरुजींना कायद्याची ‘छडी’ दाखवत तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनी कात्रीत पकडले. उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर व तहसीलदार दत्तू शेवाळे यांचा आजचा अवतार पाहून गुरुजी मात्र चाट पडले.

Web Title: Tehsildar lashes out at Guruji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.