माझे दु:ख कोणाला सांगू?- सुभाष वानखेडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:07 AM2019-04-01T00:07:34+5:302019-04-01T00:08:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : खा.राजीव सातव यांनी उमेदवारी नाकारली अन् मला दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांना खूप दु:ख झाले. मीही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : खा.राजीव सातव यांनी उमेदवारी नाकारली अन् मला दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांना खूप दु:ख झाले. मीही मागील चार-पाच दिवसांपासून हेच ऐकतोय. अशा स्थितीत माझे दु:ख कुणाला सांगू, असा सवाल काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांनी उपस्थित केला.
येथील एका रिसॉर्टमध्ये काँग्रेसचा मेळावा झाला. खा.राजीव सातव यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व नियोजनासाठी ही बैठक होती. मात्र या बैठकीचा सूर नियोजनापेक्षा सातव यांनी उमेदवारी नाकारल्याने दु:ख व्यक्त करण्याचा अन् कार्यकर्त्यांना स्वत:च्या भवितव्याच्या लागलेल्या चिंतेचाच होता. त्यातही संतोष राजेगोरेसारख्या एखाद्याने गटबाजीवर भाष्य करण्याचे धाडस दाखवले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी आवाहन केल्यामुळे काँग्रेसची एकसंघ बैठक असल्याचा समज होता. मात्र या बैठकीला केवळ खा.सातव समर्थकच उपस्थित असल्याचे दिसले. माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह त्यांच्या गटाचा कोणीही सदस्य उपस्थित नव्हता. जेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीतील सर्वजण एकदिलाने लढले तेव्हाच सेनेचा पराभव झाला, याचा साक्षीदार स्वत: असल्याचे सांगत वानखेडे यांनी विजयासाठी काँग्रेस-राष्टÑवादीने एकत्र लढण्याचे आवाहन केले.
दरम्यान, ही बैठक राजकीय चर्चेचा विषय ठरत असून समाज माध्यमावर काहींनी त्याला हवा दिली.
ते कामानिमित्त बाहेर -वानखेडे
याबाबत माजी खा.सुभाष वानखेडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता माजी आ.गोरेगावकर व जवळगावकर हे दोघेही कामानिमित्त दुसरीकडे होते. काल जवळगावकर तर आज गोरेगावकर यांच्यासोबतही कार्यक्रम झाले, असे त्यांनी सांगितले.
गुजरातचे प्रभारी असल्याने व तेथे दहापेक्षा जास्त खासदार निवडून आणण्यासाठी हिंगोलीत लढत नसल्याचे सातव यांनी जाहीर करूनही त्यांनी रणांगण सोडल्याचा प्रचार शिवसेनेकडून होत आहे. आज पुन्हा या बैठकीत त्यांनी माझ्या एका खासदारकीपेक्षा दहा खासदार निवडून येणे पक्षासाठी जास्त महत्त्वाचे आहे. मी पुढील पाच वर्षे कोणतीच निवडणूक न लढता पक्षकार्य करणार आहे, असे त्यांनी सांगितले. तर आगामी विधानसभाही डोक्यात नाही. अनेक खासदार-आमदार तयार करता यावेत, ही भूमिका असल्याचेही सातव म्हणाले.
सातव भावी मुख्यमंत्री - वानखेडे
उमेदवार सुभाष वानखेडे यांनी अशोकराव चव्हाण यांचे नाव घेताना माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. तर खा.राजीव सातव यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करताच मोठी घोषणाबाजी झाली.