सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:34 AM2021-08-17T04:34:56+5:302021-08-17T04:34:56+5:30

हिंगोली : जिल्ह्यात २० ते २२ दिवसांनंतर रविवारी पावसाचा शिडकावा झाला. या पावसाने थोडासा ओलावा निर्माण झाला असला ...

Tell me, Bholanath, will it rain? | सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?

googlenewsNext

हिंगोली : जिल्ह्यात २० ते २२ दिवसांनंतर रविवारी पावसाचा शिडकावा झाला. या पावसाने थोडासा ओलावा निर्माण झाला असला तरी अजूनही पिके तगतील असा पाऊस झाला नाही. त्यामुळे पिके संकटात सापडली आहेत. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत ढगाकडे डोळे लावून बसले आहेत.

जिल्ह्यात यावर्षी अद्याप एकदाही सर्वदूर पाऊस झाला नाही. मान्सूनपूर्व पावसावरच शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. त्यानंतर पाऊस ठिकाण बदलून बरसत होता. एका तालुक्यात पाऊस तर दुसऱ्या तालुक्यात कोरेडे हवामान पहावयास मिळत होते. ठिकाण बदलून पाऊस होत असला तरी पिके जोमात बहरली होती. खरीप हंगामातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे वाटत असतानाच पावसाने जुलैच्या मध्यापासून पाठ फिरविली. शेंगा लागण्याच्या काळातच पावसाने पाठ फिरविल्याने सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांना चांगलाच फटका बसला आहे. पावसाअभावी फुले गळून जात आहेत. पावसाची अशीच स्थिती राहिली तर बियाणाचा खर्चही निघतो की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. रविवारपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहत आहे. रविवारी रात्री काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी अद्याप पिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील पाणी साठवण प्रकल्पातही पाण्याची आवक वाढली नाही. साठवण प्रकल्पही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

तलावांना पावसाची प्रतीक्षाच

हिंगोली तालुक्यातील पारोळा, वडद, सवड, चोरजवळा, हिरडी, पेडगाव, हातगाव, सेनगाव तालुक्यातील सवना, पिंपरी, घोरदरी, बाभूळगाव, औंढा तालुक्यातील वाळकी, औंढा, पूरजळ, वंजारवाडी, पिंपळदरी, सेंदूरसना, काकडधाबा, केळी व कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी, बोथी, दांडेगाव, देवधरी, तर वसमत तालुक्यातील राजवाडी तलावांना पावसाची प्रतीक्षा आहे.

जवळपास एक महिना होत आहे. आमच्या भागात पावसाने पाठ फिरविली आहे. हा भाग माळरानाचा असल्याने पा्ऊस असेल तरच पिके येतात. आता पिके अखेरची घटका मोजत आहेत.

-आंबाजी इंगोले, शेतकरी

पेरणीनंतर एकही मोठा पाऊस झाला नाही. सध्या पाऊस नसल्याने फुले गळून पडत आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास उत्पादनात घट होऊन पेरणीचा खर्चही निघणार नाही.

-शंकर औटे, शेतकरी

पेरणी वाया

जाण्याची शक्यता

सोयाबीन -२५६५८१

कापूस ३०७२२

तूर -४०८२८

मूग- ७९५३

उडीद -५६४३

ज्वारी - ४५२९

(आकडे हेक्टर्समध्ये)

Web Title: Tell me, Bholanath, will it rain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.