निर्बंधाच्या वेळेतही काय हवे ते सांगा?; दुकाने, हॉटेल्स आतून सुरू, बाहेरून बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:31 AM2021-07-27T04:31:12+5:302021-07-27T04:31:12+5:30
या दुकानांवर लक्ष कोणाचे? संचारबंदी काळात दुकाने उघडी ठेवणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक ...
या दुकानांवर लक्ष कोणाचे?
संचारबंदी काळात दुकाने उघडी ठेवणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक पोलीस व नगरपालिका कारवाई करते. सायंकाळी शहर पोलीस ठाण्याची वाहने शहरातून गस्तही घालतात. दोन दिवसांपूर्वी दहा विक्रेत्यांवर गुन्हेही दाखल केले आहेत. मात्र, काही दुकानदार पोलिसांचे वाहन पुढे गेले की, लगेच दुकाने उघडी ठेवत आहेत.
हे घ्या पुरावे
जवाहर रोड
हिंगोली शहरातील एक फळविक्री दुकान सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. काही ग्राहक फळे खरेदी करीत होते. तसेच परिसरात गर्दीही दिसून आली.
सदरबाजार रोड
येथील एक किराणा दुकानाचे शटर अर्धे उघडे ठेवून वस्तूंची विक्री होत होती. पोलिसांची गाडी येताच शटर खाली केले जात होते. आतमध्ये दुकानदार थांबत होता.
किराणा हवा की जेवण?
हिंगोली शहरात सायंकाळी संचारबंदी आदेश लागू असले तरी रात्री उशिरापर्यंतही काही दुकाने, हॉटेल सुरू राहात आहेत. बाहेरून बंद असली तरी आतमध्ये सर्व काही अलबेल असल्याचे चित्र आहे. शहरालगतच्या जवळपास सर्वच चौकातील दुकाने, हॉटेल आदी दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू असतात.
हिंगोली शहरात सायंकाळी दुकाने उघडी ठेवणाऱ्या दुकानदारांवर पोलीस व नगरपालिकेच्या वतीने कारवाई केली जात आहे. सध्या शहरात कारवाई सुरू आहे.
- डाॅ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी