आरोपीच्या अटकेसाठी गावात तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 01:30 AM2018-09-03T01:30:26+5:302018-09-03T01:30:40+5:30
येथे एका ३४ वर्षीय तरूणाने ३० आॅगस्ट रोजी पत्नीच्या अनैतिक संबधाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. सुरूवातीला पोलिसांकडून विलंबाने गुन्हा नोंद करून घेत असताना यातील आरोपी मात्र फरार असल्याने २ सप्टेंबर रोजी गाव बंद ठेवीत ग्रामस्थांकडून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : येथे एका ३४ वर्षीय तरूणाने ३० आॅगस्ट रोजी पत्नीच्या अनैतिक संबधाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. सुरूवातीला पोलिसांकडून विलंबाने गुन्हा नोंद करून घेत असताना यातील आरोपी मात्र फरार असल्याने २ सप्टेंबर रोजी गाव बंद ठेवीत ग्रामस्थांकडून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.
गोरेगाव येथील हनुमान परसराम कावरखे (३४) यांनी पत्नीने ठेवलेल्या अनैतिक संबंधाला कंटाळून ३० आॅगस्ट रोजी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्याप्रसंगी प्रेत शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करीत असताना मयताचा भाऊ कांता कावरखे व अन्य नातेवाईक व ग्रामस्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यास गेले असता उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करता येत नाही, असे म्हणत अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचा सल्ला दिला व गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. प्रसंगी ठाण्यात ३०० ते ४०० ग्रामस्थांचा जमाव जमल्याने गुन्हा नोंद करण्याची मागणी लावून धरीत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतला.
अखेर साडेतीन तासानंतर मयताची पत्नी नीता हनुमान कावरखे, तिचा प्रियकर विठ्ठल दगडू अवचार (रा.किनखेडा जि.वाशिम) यांच्यासह आई निर्मला रमेश शिंदे, वडील रमेश गणपत शिंदे (रा.येवती जि.वाशिम) या चौघांविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र चारही आरोपी अद्याप मोकाटच असून पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेबद्दल २ सप्टेंबर रोजी गाव कडकडीत बंद ठेवीत ग्रामस्थांनी ठाण्यात मोर्चा नेला. याप्रसंगी सपोनि माधव कोरंटलू यांनी आरोपीला लवकर ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.