हिंगोलीत महायुतीतील टेंशन दूर; भाजपला बंड शमविण्यात अखेर यश, तिघांचीही माघार
By विजय पाटील | Published: April 8, 2024 02:14 PM2024-04-08T14:14:19+5:302024-04-08T14:14:48+5:30
भाजपच्या तिघांनीही माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंगोली : भाजपचे नेते तथा राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, आ.श्रीकांत भारतीय यांच्या शिष्टमंडळाने लोकसभेतील भाजप बंडखोरांची घेतलेली भेट फलदायी ठरली आहे. तीनही बंडखोरांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे हिंगोलीचे आ. तान्हाजी मुटकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हिंगोली येथे भाजप कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत अनेक मान्यवर नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुटकुळे म्हणाले, ही जागा लढावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र ती मित्रपक्षाला गेली. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना असल्या तरीही देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणे गरजेचे आहे. त्यामुळे भाजपच्या तिघांनीही माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
तर भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी रामदास पाटील म्हणाले, केंद्रातील व राज्यातील मंत्र्यांनी येथे येवून माझ्या भावना जाणून घेतल्या हेच माझ्यासाठी तिकीट आहे. माझ्या समर्थकांच्या नव्हे, पक्ष कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता मी उमेदवारी दाखल केली होती. मात्र वरिष्ठांच्या शब्दाचा आदर करून माघार घेत आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, बाबाराव बांगर, मिलींद यंबल, अशोक ठेंगल, उमेश नागरे, के.के.शिंदे, हमिद प्यारेवाले आदी उपस्थित होते.