अफगाणिस्तानात तणाव वाढला; इकडे ड्रायफ्रूट्स महागले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:34 AM2021-08-21T04:34:13+5:302021-08-21T04:34:13+5:30
हिंगोली : तालिबानींनी अफगाणिस्तानची सत्ता काबीज केली तसेच पाकिस्तानमार्गे भारतात होणाऱ्या व्यापारावर खडा पहारा ठेवल्याने आयात- निर्यात तूर्तास ...
हिंगोली : तालिबानींनी अफगाणिस्तानची सत्ता काबीज केली तसेच पाकिस्तानमार्गे भारतात होणाऱ्या व्यापारावर खडा पहारा ठेवल्याने आयात- निर्यात तूर्तास बंद झाली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत ड्रायफ्रूटही महागले आहे.
अफगाणिस्तानातून मोठ्या प्रमाणावर सुकामेवा भारतात आयात केला जात असतो. सद्यस्थिती पाहता व्यापारावर मोठा परिणाम जाणवत आहे. सुकामेव्याच्या किमती १०० ते ३०० रुपयांनी वाढल्या आहेत. चांगल्या प्रकारचे ड्रायफ्रूट आणखी ५० रुपयांनी महाग विकले जात आहे. नजीकच्या काळात आणखी किमती वाढण्याची शक्यता आहे.
पंधरा दिवसांचा स्टॉक शिल्लक
- स्थानिक बाजारात किमान पंधरा दिवस पुरेल एवढा साठा असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
- नांदेड, जालना, अकोला येथून ड्रायफ्रूट आयात केले जाते.
- तेथेच माल नसल्याने स्थानिक बाजारावर परिणाम होत आहे.
दर पूर्ववत होणे कठीण
इतर देशातून आपल्या देशात ड्रायफ्रूटस् येते. सध्या अफगाणिस्तानमध्ये तणाव आहे. याचा परिणाम ड्रायफ्रूटच्या आयातीवर झाला आहे. अफगाणिस्तानात तणाव वाढल्यापासून ड्रायफ्रूटचे भाव काही प्रमाणात वाढले आहेत.
- राजेश नेनवानी, व्यापारी
सध्या अफगाणिस्तानात तणावाची स्थिती आहे. याचा परिणाम ड्रायफ्रूटच्या किमतीवर होत आहे. ड्रायफ्रूटची आयात कमी झाल्याने स्थानिक बाजारातही ड्रायफ्रूटच्या किमती वाढल्या आहेत. ठोक बाजारातच ड्रायफ्रूटची टंचाई आहे.
- मयूर जैन, व्यापारी