डी.एड्., बी.एड्.च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना देता येणार ‘टीईटी ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:29 AM2021-08-29T04:29:14+5:302021-08-29T04:29:14+5:30
हिंगोली : महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वतीने १० ऑक्टोबरला एकाच दिवशी राज्यभरात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात येणार आहे. ...
हिंगोली : महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वतीने १० ऑक्टोबरला एकाच दिवशी राज्यभरात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात येणार आहे. या परीक्षेला आता डी.एड्., बी.एड्.च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या भावी शिक्षकांनाही टीईटीची परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे भावी शिक्षकांच्या अभ्यासाला बळ मिळाले आहे.
शिक्षक होण्यासाठी डी.एड्., बी.एड्. पदविका, पदवी असणे आवश्यक आहे, तसेच आता जिल्हा परिषदेसह खासगी शाळांतील शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे भावी शिक्षक टीईटी परीक्षेच्या जाहिरातीची वाट पाहतात. यावर्षीही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) आयोजन करण्यात आले आहे. १० ऑक्टोबर रोजी राज्यभरात एकाच दिवशी परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. यासाठी ५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. विशेष म्हणजे यावर्षी डी. एड्., बी. एड्.च्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या भावी शिक्षकांनाही टीईटी देण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे भावी शिक्षक आतापासूनच टीईटी परीक्षेच्या तयारीला लागले आहेत.
- जिल्ह्यात साडेसहाशेच्यांवर विद्यार्थी
जिल्ह्यात डी.एड्. व बी.एड्.च्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ६७०च्या जवळ आहे. यात बी.एड्.चे २५०, तर डी.एड्.च्या ४२० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही टीईटीची परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले असून ५ सप्टेंबरपर्यंत सर्वच विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करतील, अशी शक्यता असल्याचे विद्यार्थ्यांतून सांगितले जात आहे.
५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार
महाटीईटी -२०२१ परीक्षा परिषदेमार्फत १० ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. यासाठी सुरुवातीला ३ ते २५ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार होते. मात्र, डी.एड्.,बी.एड्.च्या अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा देण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे यात पुन्हा ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आवेदन पत्र भरताना पदविका, पदवीच्या संदर्भात माहिती भरताना लगतच्या मागील परीक्षेची (पदविका प्रथम वर्ष, पदवी तृतीय सत्र) माहिती भरावी लागणार आहे. प्रमाणपत्राऐवजी बैठक क्रमांक नोंद करावी लागणार आहे.
विद्यार्थी काय म्हणतात...
शिक्षक पात्रता परीक्षा देण्यासाठी अगोदर डी.एड्.,बी.एड्. अभ्यासक्रम पूर्ण करावा लागत होता. आता अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनाही टीईटी देता येणार आहे. हा निर्णय चांगला आहे. यावर्षी अंतिम वर्षाला बसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक होण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
- प्रतीज्ञा घोडगे, बी.एड्. प्रशिक्षणार्थी.
डी.एड्., बी.एड्.च्या अंतिम वर्षाला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टीईटीची परीक्षा देता येणार आहे. हा निर्णय चांगला असून विद्यार्थ्यांचे वर्ष वाचणार आहे. डी.एड्.,बी.एड्च्या अभ्यासक्रमातीलच टीईटी परीक्षेत काही भाग येतो. त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण होण्याची दुहेरी संधी मिळणार आहे.
- सतीश पवार, बी. एड्. प्रशिक्षणार्थी.