रेडिमेड कपड्यांमुळे टेलरिंग व्यवसाय धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 12:23 AM2018-11-08T00:23:24+5:302018-11-08T00:26:30+5:30
त्यामुळे कपडे शिवणाऱ्या या कामगारांवर आता हातावर हात ठेवून बसण्याची वेळ आली आहे.
हिंगोली : दिवसें-दिवस रेडिमेड कपड्यांकडे ग्राहकांचा कल वाढतच चालला आहे. रेडिमेड कपड्यांमुळे मात्र टेलरिंग व्यवसाय धोक्यात सापडला आहे. त्यामुळे कपडे शिवणाऱ्या या कामगारांवर आता हातावर हात ठेवून बसण्याची वेळ आली आहे.
शिवणकला हा पारंपरिक व्यवसाय दुारापास्त होत चालला आहे. स्टाईलिश रेडिमेड कपड्यांमुळे पारंपरिक कपडे शिवण्याचा व्यवसाय धोक्यात सापडला आहे. त्यामुळे शिंपी बांधवांसमोर स्पर्धेत टिकून राहणे कठीण झाले आहे. पारंपरिक कपडे शिवण्याचा व्यवसाय रेडिमेडच्या जमान्यात मात्र संकटात सापडल्याने व्यावसायिकांना तर हातावर हात ठेवून बसण्याची वेळ आली आहे. लग्नसोहळा सण उत्सवानिमित्त नवीन कपडे खरेदीसाठी आता रेडिमेड कपड्यांच्या दुकानावर हाऊसफुल गर्दी होते. परंतु शिंपी यांच्या दुकानावर मात्र कपडे शिवण्यासाठी गर्दी होत नाही. पूर्वी कपडे खरेदी केल्यानंतर ते शिवून घेण्यासाठी शिंपी बांधवाकडे झुंबड उडायची. हाताला काम मिळाल्याने टेलरही आनंदात असायचे. परंतु रेडिमेड स्टाईलिश आणि फॅशनेबल कपडे खरेदीकडे दिवसेंदिवस वाढणारा कल पाहता आता टेलर व्यावसायिकांकडे कोणी फिरकतही नसल्याचे चित्र आहे.
पंधरा वर्षापूर्वी होती ग्राहकांची मोठी गर्दी...
हिंगोली शहरातील सदर बाजार परिसरात रस्त्यावर बसणाºया शिंप्याकडे पंधरा वर्षापूर्वी ग्राहकांची मोठी गर्दी होत असे. कामात मग्न असल्याने व शिवणकाम हातावर सुरूच असल्यामुळे अनेकदा जेवण करायलाही वेळ मिळत नसे, असे मागील चाळीस वर्षांपासून शिवणकाम करणारे राधेश्याम चौधरी यांनी सांगितले. परंतु आता तर ऐन सणासुदीतही हातावर हात ठेवून बसावे लागत आहे. किरकोळ कामेही आता कमी झाली आहेत. रफू करणे, बटन लावणे, चेन बसविणे, फाटलेले सदरे शिवणे अशी किरकोळ कामेही आता मिळत नसल्याचे सांगितले जात होते. सध्या दुकानांतील टेलरकडे ५०० रूपयापर्यंत सदरा शिवून दिला जातो. तर रस्त्यावरील शिंपी केवळ अडीचशे ते तीनशे रूपयांत सदर शिवतात, असे चौधरी म्हणाले. मागील अनेक वर्षांपासून शिवणकाम हाच व्यवसाय असल्याने दुसरे कामही जमत नाही. त्यामुळे आता करावे तरी काय, असा प्रश्न निर्माण झाल आहे.
पूर्वी कपडे शिवण्यासाठी गर्दी होत असे
पूर्वी कपडे शिवण्यासाठी गर्दी होत असे. परंतु मागील पंधरा वर्षांपासून हाताला शिवणकाम मिळत नाही. त्यामुळे कुटुुंबावर उपासमारीची वेळ येते की काय, असा प्रश्न नेहमी भेडसावत असतो, असे ३५ वर्षांपासून टेलरिंग काम करणारे संतोष सुधाकरराव वºहाडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.