औरंगाबादेत पावसाचे ‘थैमान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 10:07 PM2017-09-20T22:07:16+5:302017-09-20T22:19:30+5:30

कानठळ्या बसविणाºया मेघगर्जनेसह बुधवारी दुपारनंतर पावसाने संपूर्ण औरंगाबाद शहराला जोरदार तडाखा दिला. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत पावसाने तीन तास थैमान घातल्याने शहरातील बहुतांश सखल भागांत पाणी साचले. घरे आणि दुकानांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी शिरले.

'Thaaman' of rain in Aurangabad | औरंगाबादेत पावसाचे ‘थैमान’

औरंगाबादेत पावसाचे ‘थैमान’

googlenewsNext
ठळक मुद्देतीन तासांत ५३.२ मि.मी. पाऊस घरे-दुकानांमध्ये पाणी

औरंगाबाद : कानठळ्या बसविणाºया मेघगर्जनेसह बुधवारी दुपारनंतर पावसाने संपूर्ण औरंगाबाद शहराला जोरदार तडाखा दिला. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत पावसाने तीन तास थैमान घातल्याने शहरातील बहुतांश सखल भागांत पाणी साचले. घरे आणि दुकानांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी शिरले. मुकुंदवाडी येथील अंबिकानगर भागात मुलगी वाहून गेल्याची घटना घडली तर अनेक ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या. चिकलठाणा वेधशाळेच्या आकडेवारीनुसार सायंकाळी ८.३० वाजेपर्यंत ५३.२ मि. मी. पावसाची नोंद झाली.
साधारण ३.४५ वाजता विद्यापीठ आणि हर्सूल तलाव परिसरात पावसाला सुरुवात झाली. हळूहळू शहराकडे वाटचाल करीत साडेचार वाजेपर्यंत संपूर्ण शहराला जोरदार पावसाने घेरले. सुमारे तीन तास चाललेल्या पावसात संपूर्ण शहर धुवून निघाले. पावसाचा जोर एवढा जबरदस्त होता की, बघता बघता शहरातील बहुतांश सखल भागांत पाणी साचून गेल्या बुधवारची पुनरावृत्ती झाली. गारखेडा परिसर, सिडको परिसर,  नूर कॉलनी, टाऊन हॉल, चिश्तिया चौक, जळगाव रोडवरील काळा गणपती, जयभवानीनगर, प्रतापनगर, हर्सूल, विद्यापीठ, टाऊन हॉल, सिटीचौक, बुढीलेन, बेगमपुरा, पोलीस आयुक्तालय, मोतीकारंजा, अंगुरीबाग, सावरकर चौक, बंजारा कॉलनी, एमजीएम परिसर, रोशनगेट, सिल्लेखाना चौक, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्टेशन रोड, जिन्सी , सातारा परिसर, सिडको, लेबर कॉलनी, मयूर पार्क, उस्मानपुरा, औरंगपुरा, ज्योतीनगर, क्रीडा संकुल, मौलाना चौक, त्रिमूर्ती चौक, चेतक घोडा, बीड बायपास, अशा सर्वच भागांत पाण्याचे डोह तयार झाले.
अग्निशमन विभागाला २५ फोन
मुसळधार पावसामुळे सायंकाळपासून अग्निशमन विभागाचा फोन खणखणण्यास सुरुवात झाली. या तीन तासांमध्ये घरांमध्ये पाणी शिरले म्हणून मदतीसाठी सुमारे २५ पेक्षा जास्त फोन आले. विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात सर्वत्र पावसाचा परिणाम जाणवला; परंतु टाऊन हॉल आणि नूर कॉलनी या परिसरात सर्वाधिक फटका बसला. तसेच दिवाण देवडी रस्त्यावर आणि जळगाव रोडवरील काळा गणपती परिसरात भिंत कोसळली. पथकाच्या सर्व गाड्या लोकांच्या मदतीसाठी पाठविण्यात आल्या.
युरिया खताची शेकडो पोती भिजली
शहरात बुधवारी सायंकाळी कोसळलेल्या मुसळधार पावसात रेल्वेस्टेशनवरील मालधक्क्यावर युरिया खताची शेकडो पोती भिजली. पोती पावसाने भिजू नये म्हणून हमालांनी मोठी धावपळ केली. परंतु अनेक पोत्यांमधील युरियाचे पाणी झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
रेल्वेस्टेशनवर दोन मालगाड्यांद्वारे अनुक्रमे २५०० आणि १८०० टन युरियाची पोती मालधक्क्यावर दाखल झाली होती. ही पोती मालधक्क्याच्या परिसरात उतरविण्यात आली होती. पावसाचा अंदाज असूनही पोती ताडपत्रीने झाकण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे सायंकाळी पावसाला सुरुवात होताच हमालांची एकच धावपळ सुरू झाली. पोत्यांच्या ढिगारावर ताडपत्री टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु तोपर्यंत अनेक पोती भिजली.

 

Web Title: 'Thaaman' of rain in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.