हिंगोली जिल्ह्यात ‘थकीत वीजबिल’ धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:58 PM2018-01-19T23:58:46+5:302018-01-19T23:59:05+5:30
महावितरणने थकीत वीजबिल न भरणा-या ग्राहकांच्या वीज जोडण्या तोडण्याचा निर्णय घेतला असून गुरूवारपासून जिल्हाभरात मोहीम सुरू केली आहे. माहे एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ पर्यंत ज्यांनी बिल भरणा केला नाही, त्यांचा वीजपुरवठा खंडीत केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महावितरणने थकीत वीजबिल न भरणा-या ग्राहकांच्या वीज जोडण्या तोडण्याचा निर्णय घेतला असून गुरूवारपासून जिल्हाभरात मोहीम सुरू केली आहे. माहे एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ पर्यंत ज्यांनी बिल भरणा केला नाही, त्यांचा वीजपुरवठा खंडीत केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
थकीत बिल न भरणा-या ग्राहकांची थेट वीज तोडली जाणार असून शासकीय कामात अडथळा करणा-यांवर महावितरणकडून गुन्हा दाखल केला जाणार आहे. संबंधित तालुक्याच्या वीज अधिकारी व कर्मचा-यांना सदर मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या शेतक-यांनी ३ हजार रूपये हप्ता भरणा केला नाही, त्यांचीही वीज जोडणी तोडली जाणार आहे. त्यामुळे शेतक-यांनी महावितरणने ठरवून दिलेला हप्ता न चुकता भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आता महावितरणने आॅनलाईन कॅश कलेक्शन सिस्टीम सुरू केली आहे. त्यामुळे थेट वीजबिल आता आॅनलाईन प्रद्धतीने मुख्य कार्यालयाकडे रक्कम जमा होणार आहे. जिल्हाभरात वीज बिल वसुली मोहिमेस गुरूवारपासून सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या वीज ग्राहकांचे बिल थकीत आहेत, त्यांनी तत्काळ महावितरणकडे भरणा करावी, असे आवाहन अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी, राजेश लोंढे, उपकार्यकारी अभियंता दिनकर पिसे यांनी केले आहे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचे थकीत बिलांच्या रक्कमेची आकडेवारी वाढल्याचे महावितरणने सांगितले. बिलासंदर्भात काही अडचण किंवा समस्या असल्यास संपर्क करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
तालुकानिहाय थकीत वीजबिल
एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ पर्यंत ज्यांनी बिल भरणा केला नाही, अशा तालुक्यांची विद्युत वितरण कंपनीने यादी काढली आहे. यामध्ये कमर्शियल, घरगुती औद्योगिकक्षेत्र तसेच ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या आकडेवारीचा समावेश आहे. हिंगोली तालुक्यातील ३ हजार २४ ग्राहकांकडे ३६६.९७ लाख रुपये थकबाकी आहे. तर वसमत येथील ४ ४७० ग्राहकांचे ३४६.८० लाख, औंढ्यात १२८३ ग्राहकांचे २९.९७ लाख, सेनगाव ३ हजार ६७४ ग्राहकांचे ५८९ लाख तसेच कळमनुरी २ हजार ९४६ वीज ग्राहकांची ५८०.११ लाख रूपये वसुली करणे बाकी आहे.
पोलिसांची मदत
वीज कर्मचा-यांना मारहाण करणाºयांवर कडक कारवाई करण्यासाठी महावितरण पोलिसांची मदत घेणार आहे. दिवसेंदिवस वसुली कामात अडथळा करणा-यांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेतला.