सातबारावरील फेरफार नोंद कायम ठेवण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याने घेतली २० हजारांची लाच
By विजय पाटील | Published: May 9, 2024 07:05 PM2024-05-09T19:05:28+5:302024-05-09T19:07:13+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बसस्थानक परिसरात रंगेहाथ पकडले
हिंगोली : सातबारा उताऱ्यावरील फेरफार नोंद कायम ठेवण्यासाठी २० हजारांची लाच घेणाऱ्या औंढा तालुक्यातील हिवरा जाटू येथील मंडळ अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ९ मे रोजी हिंगोली येथील बसस्थानक परिसरात सापळा रचून ही कारवाई केली.
तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे असलेली औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटू येथील शेत जमीन देऊबाई मधुकर काशीदे यांच्याकडून सन २०११ मध्ये खरेदी केली होती. त्यावेळी सातबारा त्यांच्या पत्नीचे नावे फेरफार नोंदविण्यात आला होता. या जमिनीच्या खरेदीबाबत देऊबाई काशीदे यांनी तक्रारदार यांच्याविरुद्ध सन २०१८ मध्ये औंढा येथील सावकारी कार्यालय येथे तक्रार केली होती. त्यामध्ये तक्रारदाराच्या बाजूने निकाल लागल्यामुळे देऊबाई काशीदे यांनी हिंगोली येथे तक्रार दिली. त्यात तक्रारदाराविरुद्ध निकाल लागला. त्यानंतर तक्रारदार यांनी या निकालाविरुद्ध महानिबंधन कार्यालय, छत्रपती संभाजीनगर व पुणे यांच्याकडे अपील केले. या प्रकरणात खरेदी खताबाबत सावकारी कार्यालयाकडे वाद न्यायप्रविष्ठ आहे. तसेच, सदर शेतीबाबत औंढा दिवाणी न्यायालयात दिवाणी दावा देखील सुरू असल्याची माहिती आहे.
यामध्ये औंढा नागनाथ तहसील अंतर्गत येणाऱ्या हिवरा जाटू येथील मंडळ अधिकारी उत्तम रतनराव डाखुरे (रा. गंगानगर, हिंगोली) याने तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे असलेली सातबारा उताऱ्यावरील फेरफार नोंद देऊबाई काशीदे यांचे नाव न करता तक्रारदार यांच्या पत्नीचेच नावे कायम ठेवण्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी यासंदर्भात हिंगोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्या तक्रारीची पडताळणी करून ९ मे रोजी हिंगोली येथील बसस्थानक परिसरात सापळा रचण्यात आला. दुपारी २ वाजेच्या सुमारास मंडळ अधिकारी उत्तम डाखुरे यास तक्रारदाराकडून २० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई उपअधीक्षक अनिल कटके, पोलिस निरीक्षक विनायक जाधव, जमादार ज्ञानेश्वर पंचलिंगे, तानाजी मुंडे, राजाराम फुफाटे, भगवान मंडलिक, शिवाजी वाघ यांच्या पथकाने केली. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
डाखुरे याने यापूर्वीही घेतली होती लाच...
मंडळ अधिकारी उत्तम रतनराव डाखुरे याने यापूर्वी २०२० मध्ये वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारली होती. याप्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात डाखुरे व एका तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.