दोन दिवसांपासून बेपत्ता वयोवृद्ध शेतकऱ्याचा मृतदेह त्याच्याच शेतातील विहिरीत आढळला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 04:40 PM2023-03-22T16:40:57+5:302023-03-22T16:41:55+5:30
वृद्ध शेतकऱ्यास कमी दिसत असल्याने विहिरीत पडल्याचा अंदाज आहे
कळमनुरी- तालुक्यातील सोडेगाव येथील एका बेपत्ता वयोवृद्ध शेतकऱ्याचा मृतदेह दोन दिवसांनंतर आज सकाळी त्याच्याच शेतातील विहिरीमध्ये ग्रामस्थांना आढळून आला. शेषराव रामराव निळकंठे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
सोडेगाव येथील शेषराव रामराव निळकंठे (70) हे 19 मार्च रोजी रात्री दहा वाजता शेतातील आखाड्यावर झोपण्यासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते घरी परत आले नाही. त्यानंतर नातेवाईकांनी शोधाशोध केली. परंतु ते कोठेच आढळून आले नाही. त्यामुळे पोलिसात हरवल्याची तक्रार देण्यात दिली. पोलिसांनी नोंद घेऊन शोध सुरू केला.
दरम्यान, आज सकाळी 7 वाजता शेषराव निळकंठे यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहिरीमध्ये तरंगत असलेला गावातील ग्रामस्थांना आढळून आला. ही माहिती पोलिसांना देण्यात आली ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे ,जमादार सांगळे, रोहिदास राठोड, शिवाजी घोगरे हे घटनास्थळी गेले त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढला.
मयत शेषराव निळकंठे यांना डोळ्याने कमी दिसत असल्यामुळे त्यांचा तोल जाऊन विहिरीत पडले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मयत शेषराव निळकंठे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे सध्या या घटनेची नोंद अजून पोलिसात झाली नव्हती.