कृत्रिम पायावरून मृतदेहाची ओळख पटवली; अनैतिक संबंधातून खून झाल्याचे उघड
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: February 10, 2024 06:41 PM2024-02-10T18:41:39+5:302024-02-10T18:42:03+5:30
मृतदेहाचा एक पाय कृत्रिम (जयपूर पाय) बसविलेला असल्याचे आढळून आले होते.
हिंगोली : येथील गारमाळ परिसरात ३५ ते ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह ९ फेब्रुवारी रोजी आढळून आला होता. पोलिसांनी कृत्रिम पायावरून मयताची ओळख पटवली असून अनैतिक संबधातून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश नागू सांगळे (रा. केळी ता. औंढा ना.) असे मयताचे तर हनुमान प्रभाकर सांगळे (रा. केळी ता. औंढा ना.) असे संशयित आरोपीचे नाव आहे. येथील खटकाळी ते गारमाळ जाणाऱ्या रोडवरील एका नाल्यात मृतदेह आढळून आला होता. मृताच्या चेहऱ्यावर मारहाण करून विद्रुप करण्यात आला होता. त्यावरून हा खूनाचा प्रकार असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.
दरम्यान, मृतदेहाचा एक पाय कृत्रिम (जयपूर पाय) बसविलेला असल्याचे आढळून आले होते. त्यावरून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, हिंगोली शहरचे नरेंद्र पाडळकर, स्थागुशाचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, हट्टा ठाण्याचे गजानन बोराटे, पोलिस अंमलदार संभाजी लेकुळे, अशोक धामणे आदींनी मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार काही पथकेही रवाना करण्यात आली. यावेळी अनोळखी मृतदेह हा सुरेश सांगळे यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
अनैतिक संबंधातून खून
दरम्यान, मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. यावेळी हनुमान सांगळे याने खून केला असल्याचे समोर आले. त्यावरून पोलिसांनी त्यास शिताफीने ताब्यात घेतले आहे. हा खून अनैतिक संबंधातून केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या दृष्टिने पोलिस तपास करीत आहेत.