आईने तीन वेळा फोन करूनही मुलगा घरी परतला नाही;अखेर रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 02:08 PM2022-06-14T14:08:37+5:302022-06-14T14:09:41+5:30
किराणा दुकान चालक युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याचा प्राथमिक अंदाज
कळमनुरी:हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर ग्रीनपार्क परिसरातील पेट्रोल पंपच्या मागे एका 23 वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. निकेश विकास कांबळे असे मृताचे नाव आहे.
ग्रीनपार्क येथे राहणाऱ्या निकेशचे किराणा दुकान होते. सोमवारी संध्याकाळी ग्रीनपार्क जवळील एका मंदिराजवळ थांबला होता. दरम्यान, रात्री ८ वाजेच्या दरम्यान निकेशच्या आईने फोन करून घरी येण्यास सांगितले. तरीही तो न परतल्याने पुन्हा रात्री १०. ३० वाजेच्या दरम्यान निकेशला आईने फोन केला. दोन्ही वेळा, ' घराकडे येतच आहे' असे उत्तर निकेशने दिले. त्यानंतरही तो घरी परतला नाही. तसेच फोन लावला असता रिंग वाजत होती पण कॉल घेत नव्हता.
यामुळे आईने त्याचा शोध घेतला असता ग्रीनपार्क जवळील पेट्रोल पंपाजवळ निकेशची बाईक आढळून आला. तर काही अंतरावर निकेश जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला आढळून आला. आईने तत्काळ त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे तपासून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
खुनाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सूनील निकाळजे, भीसे, शिंदे, घोगरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस उपअधीक्षक वाखारे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. दरम्यान, निकेशचा खून दगडाने ठेचून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. पोलीस खुनाच्या कारणांचा तपास करत आहेत.