आंतरजातीय विवाह अनुदानासाठी लिपिकाने घेतली आठ हजारांची लाच
By विजय पाटील | Published: August 28, 2023 06:43 PM2023-08-28T18:43:28+5:302023-08-28T18:44:13+5:30
आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यास शासनाकडून प्रोत्साहन अनुदान म्हणून ५० हजारांचे अनुदान देण्यात येते.
हिंगोली : आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याला मिळणाऱ्या ५० हजारांच्या अनुदानासाठी लाच स्वीकारणाऱ्या कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी ४ वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडले.
आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यास शासनाकडून प्रोत्साहन अनुदान म्हणून ५० हजारांचे अनुदान देण्यात येते. हा प्रस्ताव सादर केल्यानंतरही हा लाभ देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. हे अनुदान लवकर मिळवून देण्यासाठी संबंधित लाभार्थ्यास जि.प.च्या समाजकल्याण विभागातील कनिष्ठ लिपिक बिभीषण विष्णुपंत पांचाळ याने लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराची तशी इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यावरून सापळा रचला असता जि.प.च्या समाजकल्याण विभागात पांचाळ यास आठ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास हा प्रकार घडला. यामुळे जि.प.त एकच खळबळ उडाली. बघ्यांचीही गर्दी जमली होती.