थंडीचा कडाका वाढला, धुक्यामुळे रेल्वेचा वेग मंदावला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 04:42 PM2023-01-10T16:42:13+5:302023-01-10T16:42:41+5:30
मागच्या आठवडाभरापासून ढगाळ व धुकेमय वातावरण निर्माण झाले आहे.
हिंगोली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे काही दिवस वातावरण ढगाळ झाले होते. आता पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. थंडी, धुक्यामुळे रेल्वेच्या वेगावरही परिणाम झालेला पहायला मिळत आहे.
मागच्या दोन आठवड्यांपूर्वी दिल्ली, अमृतसर, जम्मूतावी, नागलडॅम, हमसफर या रेल्वेगाड्याहिंगोली रेल्वे स्टेशनवर वेळेवर येत होत्या. परंतु, गत आठवड्यापासून थंडीचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे सर्वच रेल्वेचा वेग मंदावलेला पहायला मिळत आहे. हिंगोली स्थानकावर जम्मूतावी ते नांदेड, नागलडॅम आणि हमसफर या व इतर एक्स्प्रेस रेल्वे गाड्या सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेदरम्यान येत होत्या. परंतु, वाढत्या थंडीमुळे या रेल्वेगाड्या रात्री आठ वाजेपर्यंत येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकात कुडकुडत रेल्वेची वाट पाहत बसावे लागत आहे. ढगाळ वातावरण, धुक्याचा परिणाम रेल्वेच्या गतीवर होत आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
धुक्यामुळे होतोय परिणाम..
मागच्या आठवडाभरापासून ढगाळमय व धुकेमय वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर पहाटे चार ते सकाळी सहा वाजेपर्यंत धुके पडलेले दिसून येत आहे. रेल्वेचा प्रवास सुखकर असल्यामुळे अनेक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. अशावेळी त्यांची काळजी चालकाला घ्यावी लागते. धुक्यामुळे चालकाला रेल्वे सावकाश चालवावी लागत आहे. रेल्वे चालवित असताना सिग्नल प्रणाली ही चालकाला योग्य प्रमाणात दिसणे आवश्यक असते. जेणेकरून सुरक्षित प्रवास करणे संभाव असतो. धुक्यामध्ये रेल्वे वेगाने चालविणे अवघडच असते.
-प्रवीण पवार, मुख्य वाणिज्य निरीक्षक, वाशिम