समोरच्या वाहनास धडकल्याने ट्रकच्या केबिनचा चुराडा; एकाचा जागीच मृत्यू
By यशवंत भीमराव परांडकर | Updated: January 17, 2024 19:34 IST2024-01-17T19:33:17+5:302024-01-17T19:34:16+5:30
अपघातानंतर समोरील अज्ञात वाहन मात्र न थांबताच घटनास्थळावरून निघून गेले

समोरच्या वाहनास धडकल्याने ट्रकच्या केबिनचा चुराडा; एकाचा जागीच मृत्यू
- विश्वास साळुंके
वारंगा फाटा (जि. हिंगोली): वारंगा ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर वारंगा फाटा येथे पहाटे पाच वाजेच्या सुमारास समोरील वाहनावर ट्रक पाठीमागून धडकला. या भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाला.
१७ जानेवारी रोजी पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान ट्रक (क्र. एमएच २६-बीइ ८१९१) नागपूरहून वाटाण्याच्या शेंगा भरून लातूरकडे जात होता. सदरील ट्रक वारंगा फाटा येथील चौकाजवळ आल्यावर समोरील एका वाहनावर पाठीमागून जोरात धडकला. या अपघातात ट्रकमधील बालाजी अंकुश दैठणेकर (वय २३, रा. खांबेगाव, ता. लोहा, जि. नांदेड) याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, समोरील अज्ञात वाहन मात्र वारंगा फाटा येथे न थांबताच घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली.
या घटनेची माहिती मिळताच वारंगा फाटा पोलिस मदत केंद्राचे बिट जमादार रोहिदास राठोड, प्रभाकर भोंग, होमगार्ड सुरेश डोके यांनी घटनास्थळी धाव घेऊन केबिनमध्ये अडकलेल्या मयतास बाहेर काढून डोंगरकडा येथे उत्तरीय तपासणीसाठी घेऊन गेले. डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहसीन खान यांनी उत्तरीय तपासणी केली. अपघातग्रस्त ट्रकच्या चालकाचे नाव मात्र समजू शकले नाही. बातमी लिहीपर्यंत आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यामध्ये या अपघातासंदर्भात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.