चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स उलटली; १५ प्रवाशी जखमी, ३ गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 11:30 AM2024-05-30T11:30:30+5:302024-05-30T11:31:16+5:30
वसमत शहराजवळील जिंतूर टी-पॉईंट जवळ झाला अपघात
- इस्माईल जहागीरदार
वसमत (जि. हिंगोली): चालकाचे नियंत्रण सुटल्याने राजस्थान येथील जोधपूर येथून हैद्राबादला जाणारी ट्रॅव्हल्स बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात १५ प्रवाशी जखमी झाले. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात नांदेड ते औंढा नागनाथ मार्गावरील जिंतूर टी पॉइंट जवळील टोल नाक्याजवळ गुरुवारी सकाळी ७.३० वाजता घडला.
राजस्थान राज्यातील जोधपूर येथून एक ट्रॅव्हल्स हैद्राबाद येथे प्रवाशी घेऊन निघाली होती. सकाळी साडेसात वाजता वसमत शहराजवळील जिंतूर टी-पॉईंट जवळील टोल नाक्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स बस रस्ताच्या कडेला उलटली. प्रसंगावधान राखून तेथील नागरिकांनी तत्काळ धाव घेत प्रवाशांना ट्रॅव्हल्समधून बाहेर काढले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि अनिल काचमांडे, रामा लोखंडे, अंबादास विभूते आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातात १५ जण जखमी झाले तर ३ जण गंभीर जखमी आहेत. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे. वेळीच उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गंगाधर काळे व वैद्यकीय अधिकारी यांनी जखमीवर उपचार सुरू केले होते.