इलेक्टिव्ह मेरिटचा मुद्दा, भाजपच्या अडेलतट्टूपणासमोर शिंदे सेनेचे लोटांगण

By विजय पाटील | Published: April 3, 2024 11:18 AM2024-04-03T11:18:35+5:302024-04-03T11:20:01+5:30

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जर शिंदे सेनेच्या विद्यमान खासदारांना तिकिटे मिळणार होती, तर तेथे भाजपने तयारी करणेच गैर होते. मात्र तरीही तो प्रकार घडला.

The Elective Merit issue, Shinde Sena's set back to BJP's incompetence | इलेक्टिव्ह मेरिटचा मुद्दा, भाजपच्या अडेलतट्टूपणासमोर शिंदे सेनेचे लोटांगण

इलेक्टिव्ह मेरिटचा मुद्दा, भाजपच्या अडेलतट्टूपणासमोर शिंदे सेनेचे लोटांगण

हिंगोली : राज्यात अनेक ठिकाणी भाजपच्या मंडळीने इलेक्टिव्ह मेरिटचा मुद्दा पुढे करीत शिंदे सेनेच्या जागांवर दावा केला. त्यापैकीच एक असलेल्या हिंगोली लोकसभेत उमेदवारी जाहीर केल्यानंतर इतर पर्यायांचा विचार करावा लागत आहे. त्यामुळे भाजपच्या अडेलतट्टूपणासमोर शिंदे सेना लोटांगण घालत असल्याचा संदेश जात असून याचा फटका बसण्याचीच जास्त शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जर शिंदे सेनेच्या विद्यमान खासदारांना तिकिटे मिळणार होती, तर तेथे भाजपने तयारी करणेच गैर होते. मात्र तरीही तो प्रकार घडला. शेवटी पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी उमेदवार कामाला लावले असे सांगत भाजपकडून हा प्रकार रेटून नेला जात होता. मात्र हे संघटन मजबूत करण्याच्या नादात शिंदे गटाशी भाजपची दुफळी निर्माण झाली. ही दुफळीच आता थेट ही जागा धोक्यात आणते की काय? अशी भीती निर्माण झाली. एवढेच काय तर आगामी लोकसभा निवडणुकीतही शिंदे सेना व भाजपच एकमेकांविरोधात काम करून पाडापाडीच्या राजकारणाला वेग देण्याची शक्यता नाकारता येत नाही. आतापर्यंत पक्षाच्या नावाखाली चालू असलेले राजकारण आता वैयक्तिक पातळीवर उतरले आहे. कोणी कसा जाणीवपूर्वक गेम करतेय, हे दोन्हीकडच्याही कार्यकर्त्यांना दिसत आहे. हिंगोलीचे पडसाद जसे नांदेड लोकसभेत उमटले. तसे उद्या विधानसभेतही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटी इलेक्टिव्ह मेरिटही भाजपच ठरवित असल्याने तगड्यांना सोडून दुबळ्यांना पाचारण करून भाजप नेमके काय साध्य करणार आहे? हे कळायला मार्ग नाही. मात्र आता शिंदे सेनेतही यावरून अंतर्गत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

भाजपने घेतलेल्या बैठकीनंतर हिंगोली लोकसभेतील वातावरण बिघडले. उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करणाऱ्या हेमंत पाटील यांनी ती टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. कालपासून ते व त्यांचे समर्थक मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. मात्र आश्वासनाच्या पलिकडे त्यांच्या हाती सध्या तरी हाती काही आले नाही. दुसरीकडे भाजपमधील मंडळींना हाती धुपाटणे येणार असल्याचे लक्षात येताच निदान विधानसभेला तरी त्रासदायक ठरू नये म्हणून हेमंत पाटील यांना विरोध नाही, आम्ही आमच्यासाठी उमेदवारी मागत होतो, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ही उपरती होण्यास इतका विलंब झाला की, तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

आता तरी उमेदवारीवर एकमत होणार?
मुख्यमंत्र्यांनी आणखी एका सर्व्हेक्षणाचा अहवाल येणार असल्याचे सांगून पाटील यांची उमेदवारी अद्याप रद्द केली नाही. दुसरा पर्यायही तयार ठेवला आहे. मात्र या पर्यायालाही बाहेरचा उमेदवार अल्पावधीत पूर्ण मतदारसंघ कव्हर करेल का? अशी नावे ठेवली जात आहेत. त्यामुळे भाजपच्या मंडळीला त्यांचा उमेदवार दिल्याशिवाय समाधान लाभणार नसल्याचे दिसत आहे. यात वेळ मात्र निघून जात असून दुसरीकडे महाविकास आघाडी प्रचाराला लागली आहे. यावेळी जागा पाडून भविष्यात या जागेवर दावा करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठीही भाजपकडून ही खेळली जात असावी, अशी चर्चाही रंगत आहे. तर जिल्ह्यातून एखादा बंडखोर देवून भाजप आपले इप्सित साधू शकते, या चर्चेलाही तोंड फुटले आहे.

Web Title: The Elective Merit issue, Shinde Sena's set back to BJP's incompetence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.