'शेती अन् पिकही आमचे'; दमदाटी करत दीराने भावजयीच्या शेतातून २५ क्विंटल हळद पळवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:45 IST2025-04-02T12:44:36+5:302025-04-02T12:45:19+5:30
वसमत तालुक्यातील फाटा शिवारातील घटना; नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

'शेती अन् पिकही आमचे'; दमदाटी करत दीराने भावजयीच्या शेतातून २५ क्विंटल हळद पळवली
वसमत (जि. हिंगोली) : शेत जमीन व त्यातील शेतमाल आमचा आहे, दमदाटी करत जवळपास २५ क्विंटल हळद पळवून नेल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी फाटा शिवारात घडला. याप्रकरणी फिर्यादीनंतर ग्रामीण पोलीस ठाण्यात नऊ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
वसमत तालुक्यातील फाटा शिवारातील शेत जमीनीचा दीर व भावजयीत वाद आहे. भावजयीने पिकवलेली हळद दिराने गैर कायद्याची मंडळी जमवून शेती आमची आहे शेतातील शेतीमाल पण आमचा आसे म्हणत हळदीचे ४८ कट्टे अंदाजे ३ लाख ७५ हजार रुपयांची २५ क्विंटल हळद पळवली. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
वसमत तालुक्यातील फाटा शिवारातील शेत जमिनीबाबत अकोली येथील ताराबाई माणिकराव कदम (५५) आणि विठ्ठल कदम या भावजयी व दिर यांच्यात वाद आहेत. या वादातून १ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता फाटा शिवारातील शेतात ताराबाई कदम यांना विठ्ठल कदम, गोविंद कदम, गोपाळ कदम, मारुती कदम, ज्ञानेश्वर कदम (सर्व रा.अकोली) दाऊत कल्याणकर, सुदर्शन कल्याणकर, (दोघे रा खरबी ता भोकर जि नांदेड) आणि तर दोघांनी जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तसेच शेती आमची आहे, शेतमाल आमचा आहे, असे म्हणत त्यांनी ३ लाख ७५ हजार रुपयांची २५ क्विंटल हळद वाहनात टाकून पळवून नेली.
दरम्यान, याप्रकरणी ताराबाई कदम यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास सपोनि गजानन बोराटे, अजय पंडित यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी करत आहेत.