Video: शेतात जाण्यास वडिलांना त्रास होऊ लागला, मुलाने भंगारातून बनवली इलेक्ट्रिक बाईक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 02:25 PM2023-08-24T14:25:23+5:302023-08-24T14:28:39+5:30

भंगारातून भरारी! शेतकऱ्याच्या मुलाने बनविली टाकाऊतून इलेक्ट्रिक बाईक; ही बाईक अडीज तासाच्या चार्जिंगमध्ये १०० किमी धावते 

The father started having trouble going to the farm, the son made an electric bike from scraps | Video: शेतात जाण्यास वडिलांना त्रास होऊ लागला, मुलाने भंगारातून बनवली इलेक्ट्रिक बाईक

Video: शेतात जाण्यास वडिलांना त्रास होऊ लागला, मुलाने भंगारातून बनवली इलेक्ट्रिक बाईक

googlenewsNext

- इस्माईल जाहगीरदार
वसमत:
एखादी वस्तू, वाहन खराब झाले की, आपण एक तर अडगळीला टाकतो नाही तर भंगारात टाकतो. परंतु पार्डी (खुर्द) येथील शेतकरी कुटुंबातील होतकरू युवकाने भंगारातील साहित्य गोळा करुन चक्क इलेक्ट्रिक दुचाकी बनविली आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वसमत तालुक्यातील पार्डी (खु.) येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील २० वर्षीय तरुण लोभाजी नरवाडे याने अवघ्या ३५ हजार रुपयांमध्ये भंगारातील साहित्यातून इलेक्ट्रिक दुचाकी बनविली. ही दुचाकी अडीच तास चार्जिंग केल्यानंतर १०० किलोमीटर धावू लागली आहे. दुचाकी बनविण्यासाठी लोभाजी नरवाडे याने तीन ते चार दिवस रात्रंदिवस अभ्यास केला. यापुढे चारचाकी प्रदूषणमुक्त कार बनविणार असल्याचा मानस लोभाजीने बोलून दाखविला.

वसमत तालुक्यातील पार्डी (खु.) येथील अल्पभूधारक शेतकरी लिंबाजी नरवाडे यांचा मुलगा लोभाजी नरवाडे (वय २०) याने वडिलांना शेताकडे जाताना होणारा त्रास पाहून जिद्दीने प्रदूषणमुक्त दुचाकी बनविण्याचा निर्णय घेतला. प्रथम लोभाजीने भंगारातील जुन्या दुचाकीचे ४ हजार रुपये किमतीत पार्ट खरेदी केले. दुचाकीसाठी लागणारी चार्जिंग ७२ व्हॅट, ४० एएम पाॅवरफुल बॅटरी तिची किंमत २२ हजार रुपये व २०० ते २५० किलो वजन ओढण्याची क्षमता असलेली पाॅवरफुल ‘बीएलडीसी’ मोटार व इतर साहित्य खरेदी केले. तसेच दुचाकीला लागणारे साहित्य खरेदीसाठी त्याला ३५ हजार रुपये खर्च आला. यानंतर दुचाकी बनविणे सुरू केले. यासाठी तीन दिवस लागले. भंगारातील साहित्यातून बनविलेली दुचाकी चढ-उतारावर धावत आहे,विनागेरची ही दुचाकी आहे. त्या दुचाकीवर सहज २०० ते २५० किलो वजन नेता येते. मी प्रदूषणमुक्त दुचाकी बनविली. भविष्यात प्रदूषणमुक्त कार बनविणार आहे, असे लोभाजी नरवाडे याने सांगितले.

कौशल्य विकास योजनेंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण...
लोभाजी नरवाडे याचे प्राथमिक शिक्षण दांडेगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात झाले. वसमत येथे बारावी व बीए शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नांदेड येथे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण केला. यापुढे आणखी टेक्निकल शिक्षण घेणार असल्याचे लोभाजी याने सांगितले.

Web Title: The father started having trouble going to the farm, the son made an electric bike from scraps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.