नीट परीक्षेच्या ताणतणावातून विद्यार्थीनीने संपवले जीवन
By विजय पाटील | Published: June 18, 2024 05:14 PM2024-06-18T17:14:17+5:302024-06-18T17:15:13+5:30
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील घटना
हिंगोली: वसमत शहरातील विद्यानगर भागात राहणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थीनीने नीट परीक्षेच्या ताणतणावातून घराच्या छतास असलेल्या लोखंडी हुकला साडी बांधून गळफास घेतला. ही घटना रविवारच्या रात्री घडली. या प्रकरणी शहर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वसमत शहरातील विद्यानगर भागात शिक्षणासाठी राहत असलेल्या दिपीका दौलत खंदारे (वय १७, रा. आहेरवाडी, ता. पूर्णा, जि. परभणी) ही बारावी उत्तीर्ण आहे. ती नीट परीक्षेची तयारी करीत होती. परंतु तिला यामध्ये ताणतणाव अधिकच येत होता. याच ताणतणावातून तिने रविवारी मध्यरात्री घराच्या छतास असलेल्या लोखंडी हुकाला साडी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.
हा प्रकार सोमवारी पहाटे घरच्यांच्या लक्षात आला. यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना ही माहिती दिली. यानंतर घटनास्थळी पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, जमादार शेख हकीम यांनी भेट देवून पंचनामा केला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सदाशिव खंदारे यांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणाचा तपास वसमत शहर पोलिस करीत आहेत.