उन्हाची तीव्रता वाढली; सिद्धेश्वर जलाशयाने गाठला तळ, धरणात केवळ ७ टक्के उपयुक्त जलसाठा
By विजय पाटील | Published: April 2, 2024 07:28 PM2024-04-02T19:28:03+5:302024-04-02T19:29:01+5:30
पाण्याचा अपव्यय टाळा; धरण प्रशासनाचे आवाहन
हिंगोली: उन्हाळी हंगामाच्या पहिल्या पाणीपाळीत औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर जलाशयाने तळ गाठला असून, २ एप्रिल रोजी धरणात केवळ ७ टक्के (५ दलघमी) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गत चार वर्षातील सिद्धेश्वर धरणाची ही निच्चांकी पाणीपातळी होय. दरम्यान, उन्हाळी हंगामाच्या दुसऱ्या आवर्तनासाठी येलदरी धरणातून पाण्याची मागणी करण्यात आली असून, विद्युत निर्मितीद्वारे पूर्णा नदीपात्रातून सिद्धेश्वर प्रकल्पात पाणी सोडण्यात येणार आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाच्या पूर्णा मुख्य कालव्याद्वारे सद्य:स्थितीत उन्हाळी हंगामाचे पहिले आवर्तन देण्यात येत आहे. यापूर्वी हिवाळी हंगामासाठी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात प्रत्येकी २८ दिवसांप्रमाणे दोन आवर्तने देण्यात आली असून, यंदा सिंचनासाठी आजपर्यंत सिद्धेश्वर धरणातील जवळपास १५० दलघमी पाणी खर्च करण्यात आले. सिद्धेश्वर धरणात उपयुक्त पाण्याची साठवण क्षमता केवळ ८० दलघमी आहे. त्यामुळे प्रत्येक पाणीपाळीनंतर पुढच्या आवर्तनासाठी येलदरी धरणातून पाणी मागविणे क्रमप्राप्त ठरते.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला सिद्धेश्वर धरणात ६५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असताना उन्हाळी हंगामाच्या पहिल्या पाणीपाळीस २ मार्चदरम्यान सुरुवात करण्यात आली. कालवा सल्लागार समितीच्या नियोजन बैठकीत ठरल्याप्रमाणे सदर आवर्तन २८ दिवसात (३० मार्च) संपणे आवश्यक असताना नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव लाभक्षेत्रात पाणी पूर्ण क्षमतेने पोहोचले नाही. त्यामुळे रोटेशनच्या कालावधीत वाढ करण्यात आल्याचे कळते. परंतु, सदर वाढीव कालावधीमुळे जवळपास ८ ते १० दलघमी जास्तीचे पाणी खर्च करावे लागणार आहे. त्यामुळे पाण्याचे गणित कोलमडणार तर नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे.
६ घनफूट प्रतिसेकंदप्रमाणे पाणी येणार...
२ एप्रिल रोजी घेतलेल्या पाणीपातळीच्या नोंदीनुसार सिद्धेश्वर धरणात केवळ ७ टक्के (५ दलघमी) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. उन्हाळी हंगामाच्या पहिल्या पाणीपाळीस वाढीव कालावधी दिल्यामुळे पुढील दोन दिवस पुरेल एवढेच पाणी धरणामध्ये शिल्लक आहे. त्यामुळे पुढील आवर्तनासाठी येलदरी धरणावरील तिन्ही विद्युत निर्मिती संच चालू करण्याची शिफारस पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बिराजदार यांनी विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे. त्यानुसार ३ एप्रिलपासून येलदरी धरणातून विद्युत निर्मितीद्वारे साधारणतः ६ घनफूट प्रतिसेकंदप्रमाणे पूर्णा नदीपात्रातून सिद्धेश्वर धरणात विसर्ग सोडण्यात येणार आहे.
- सय्यद खालिद, उपविभागीय अभियंता