औंढा पोलिस ठाणे इमारतीच्या छताचे प्लास्टर निखळले; जीवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 03:29 PM2024-06-07T15:29:37+5:302024-06-07T15:30:39+5:30

औंढा पोलिस ठाण्यातील प्रकार; निजामकालीन इमारतीत चालतो कारभार

The plaster of the roof of the Aundha police station building was dislodged | औंढा पोलिस ठाणे इमारतीच्या छताचे प्लास्टर निखळले; जीवितहानी टळली

औंढा पोलिस ठाणे इमारतीच्या छताचे प्लास्टर निखळले; जीवितहानी टळली

हिंगोली: औंढा नागनाथ येथील पोलिस ठाण्यातील इमारतीच्या छताचे प्लास्टर ५ जून रोजी दुपारी अचानक निखळले. ही घटना घडली त्यावेळी पोलिस कर्मचारी बाहेर होते. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. ‘लोकमत’ ने याबाबत एका दिवसापूर्वीच पोलिस ठाण्यासह वसाहतीची दुरवस्था झाल्याची बातमी प्रकाशित केली होती.

औंढा नागनाथ येथील पोलिस ठाण्याच्या कारभार जीर्ण झालेल्या निजामकालीन इमारतीतून चालतो आहे. तसेच त्यांनतर बांधकाम करण्यात आलेल्या इमारतीसह पोलिस वसाहतीचे बांधकाम जुने आहे. त्यामुळे इमारतीच्या भिंती व छतामध्ये पाणी झिरपून इमारती कमकुवत झाल्या आहेत. गत काही वर्षांपासून पोलिस ठाण्याची मुख्य इमारत धोकादायक असल्याचे बांधकाम विभागाकडून कळविण्यात आले. त्यानंतरही इतरत्र व्यवस्था नसल्यामुळे जीर्ण इमारतीतून कारभार चालविला जात आहे. जीर्ण झालेल्या इमारती व अपुऱ्या जागेमुळे गुन्हेगारांच्या विविध दस्तावेजांसह पोलिस हत्यारे ठेवण्यास सुद्धा जागा उपलब्ध नसल्याचे कळते. मोठ्या पावसालाच सुरुवात होण्यापूर्वीच छताचे प्लास्टर निखळल्याने पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी नेमके बसायचे कुठे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जेवणासाठी बाहेर पडले अन् छताचे प्लास्टर निखळले....
दुपारी जेवणाची वेळ होत असल्यामुळे कर्मचारी बाहेर पडले आणि काही क्षणातच त्या छताचे प्लास्टर निखळले. जेवणाच्या निमित्ताने बाहेर आल्यामुळे सुदैवाने कुणासही कोणत्याही प्रकारची इजा पोहचली नाही.

पोलिस निरीक्षिकांचे कार्यालय स्थलांतरित...
जीर्णावस्थेत असलेल्या निजामकालीन इमारतीत असलेले पोलिस निरीक्षकांचे कार्यालय कालच्या घटनेमुळे स्थलांतरित केले आहे. त्यानंतर ते येथील महिला समुपदेशनासाठी असलेल्या इमारतीत हलविण्यात आले आहे. त्यामुळे तात्पुरती व्यवस्था झाली असली तरी पोलिस ठाण्यातील इतर कामकाजासाठी व पोलिसांचे निवासस्थान असलेल्या वासहतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीसह वसाहतीचे बांधकाम करणे आवश्यक आहे.
 

Web Title: The plaster of the roof of the Aundha police station building was dislodged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.