आंदोलकांनी कृषी केंद्राच्या गोदामाचे सील तोडत युरियाचे केले वितरण
By विजय पाटील | Published: July 31, 2023 04:54 PM2023-07-31T16:54:24+5:302023-07-31T16:54:50+5:30
युरियाची चढ्या दराने विक्री स्वाभिमानी आक्रमक
- दिलीप कावरखे
गोरेगाव (जि. हिंगोली) : जिल्ह्यामध्ये युरिया खताची कृत्रिम टंचाई भासवत काही कृषी सेवा केंद्र चालकांकडून युरियाची चढ्या दराने विक्री केली जात आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ३१ जुलै रोजी सदर प्रकाराचा भांडाफोड करीत सेनगाव तालुक्यातील हाताळा येथील एका कृषी केंद्र गोदामाचे सील तोडीत पोलिस बंदोबस्तामध्ये शेतकऱ्यांना वाजवी दरात युरिया खताचे वितरण करण्यात आले.
गोरेगाव भागात सध्या युरीया खताच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना युरियाच्या शोधात भटकंती करीत चढ्या दराने युरिया खरेदी करीत आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. कृषी केंद्र चालकांकडून युरियाचा कृत्रिम तुटवडा भासवत चढ्या दराच्या विक्रीतून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. असाच प्रकार सेनगाव तालुक्यातील हाताळा येथे सुरु असल्याबाबत माहिती देत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या गजानन कावरखे, नामदेव पतंगे, दशरथ मुळे, माधव देशमुख, सखाराम भाकरे आदी कार्यकर्त्यांकडून ३१ जुलै हाताळा येथील हनुमान कृषी सेवा केंद्राच्या गोदामाचे लॉक तोडीत युरियाच्या कृत्रिम टंचाईचा भांडाफोड करण्यात आला.
याप्रसंगी प्रती बॅग ४०० ते ४२५ रुपये या चढ्या दराने युरियाची विक्री करीत असल्याबाबत कृषी केंद्र चालक प्रकाश मुंदडा यास धारेवर धरले. यावेळी शेतकऱ्यांची वाढती गर्दी बघता पोलिस प्रशासनास पाचारण करीत गोदामामध्ये साठवून ठेवण्यात आलेल्या जवळपास १२५ ते १५० युरिया पोत्यांचे पोलिस बंदोबस्तामध्ये शेतकऱ्यांना वाजवी दरात वितरण करण्यात आले.
कृषी केंद्र चालक की किराणा दुकानदार ...?
हाताळा येथे प्रकाश मुंदडा यांचे किराणा दुकान असून ते आपल्या गोदामामधून खतांची सुद्धा विक्री करतात, असे ग्रामस्थांनी सांगितले. तर मुंदडा यांच्या म्हणण्यानुसार ते हनुमान कृषी सेवा केंद्राच्या परवान्याआधारे खतांची व कृषी उत्पादनांची विक्री करतात असे त्यांनी सांगितले. याबाबत तालुका कृषी अधिकारी संदीप वळकुंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नतंर माहिती देतो असे म्हटले.