हळदीच्या वाहनांची रांग लांबतेय; शेतकऱ्यांचा मार्केट यार्डातला मुक्काम वाढला
By रमेश वाबळे | Published: April 5, 2024 07:01 PM2024-04-05T19:01:52+5:302024-04-05T19:06:15+5:30
जवळपास पाच हजार क्विंटल हळद विक्रीसाठी मार्केट यार्डमध्ये; वाहनांच्या रांगा कायम
हिंगोली : येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात मागील दोन दिवसांपासून हळदीची आवक वाढली आहे. ५ एप्रिल रोजी जवळपास पाच हजार क्विंटल हळद विक्रीसाठी आल्याने मार्केट यार्ड आवाराच्या बाहेर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
हिंगोली येथील संत नामदेव मार्केट यार्ड हळद खरेदी - विक्रीसाठी मराठवाड्यासह विदर्भात प्रसिद्ध आहे. या मार्केट यार्डात मागील पंधरवड्यापासून सरासरी दीड ते दोन हजार क्विंटल हळदीची आवक होत होती. मध्यंतरी मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्ड बारा दिवस बंद होते. ३ एप्रिल रोजी मार्केट यार्ड सुरू होताच आवक वाढली. शुक्रवारी पाच हजार क्विंटलवर हळद विक्रीसाठी आली होती. त्यामुळे मार्केट यार्ड आवारात वाहने उभी करण्यासाठी जागा अपुरी पडल्याने रेल्वेस्टेशन रोडवर रांग लागली होती.
शेतकऱ्यांचा दोन दिवसांचा मुक्काम....
मार्केट यार्डात हळदीची आवक वाढल्यामुळे एका दिवसात मोजमाप होणे शक्य होत नसल्याने शेतकऱ्यांना एक ते दोन दिवसांचा मुक्काम टाकावा लागत आहे. येणाऱ्या दिवसात आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजार समितीने काट्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
१३ ते १६ हजार रुपये भाव....
यंदा उत्पादनात घट झाली असली तरी हळदीला समाधानकारक भाव मिळत आहे. सध्या हिंगोलीच्या मार्केट यार्डात १३ ते १६ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. येणाऱ्या दिवसांतही भाव कायम राहण्याची अपेक्षा आहे.